सह्याद्री ते हिमालय: ‘कोल्हापूर हायकर्स’ची पवित्र जल संकलन मोहीम संपन्न
schedule02 Jun 26 person by visibility 174 categoryसामाजिक
कोल्हापूर : दुर्गराज रायगड: ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून 'कोल्हापूर हायकर्स' संस्थेतर्फे आयोजित 'पवित्र जल संकलन मोहीम - २०२६' अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक मोहीम राबवण्यात आली.
गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत, कोल्हापूर हायकर्सचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यभूमीतील गडकोट, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री यांसारख्या पवित्र नद्यांसह हिमालयातील कैलास दर्शनभूमीपर्यंतच्या दुर्गम ठिकाणांहून जल संकलित करत आहेत. यंदा या मोहिमेचे १५ वे वर्ष असून, ५ व ६ जून २०२६ रोजी रायगडवर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या पवित्र जलाने शिवमुर्तीवर जलाभिषेक करण्यात येणार आहे.
ही मोहीम केवळ जलसंकलन नसून, सह्याद्री आणि हिमालय यांना जोडणारा स्वराज्य, श्रद्धा, शौर्य व इतिहासाचा संगम आहे. १८,३०० फूट उंचीवरील लिपुलेख पास (कैलास दर्शनभूमी) सारख्या सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठिकाणांहून केलेले जल संकलन, भारतीय जवानांच्या शौर्याला आणि सीमेच्या संरक्षणाला दिलेला मानाचा मुजरा आहे.
'कोल्हापूर हायकर्स'चे संस्थापक-अध्यक्ष सागर श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलव्यवस्थापनाचा आदर्श आजही प्रेरणादायी आहे. या मोहिमेद्वारे स्वराज्याच्या ऐतिहासिक परंपरेचे जतन, नद्यांचे संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश समाजमनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे."
"स्वराज्याने जपलेले जल... आता जतन करणे हीच आपली ऐतिहासिक जबाबदारी!" हा मंत्र घेऊन ही मोहीम अविरत सुरू आहे. 'सेव्ह रिव्हर, सेव्ह अर्थ, सेव्ह हिस्ट्री' या त्रिसूत्रीचा प्रसार करत या हायकर्सनी इतिहासाची आणि नैसर्गिक ठेव्याची साक्ष जपत एक आगळावेगळा इतिहास घडवला आहे.
या मोहिमेच्या निमित्ताने आयोजित प्रेस कॉन्फरन्सला कोल्हापूर हायकर्सचे संस्थापक-अध्यक्ष सागर श्रीकांत पाटील यांच्यासह हायकर्सचे सदस्य विजय ससे, अविनाश भाले, इंद्रजीत मोरे, अमरसिंह शिंदे, विष्णु सूर्यवंशी, अतुल सुतार, श्रेयस ढवळे, सचिन भाट, डॉ. राजेंद्र भस्मे, अक्षय पाटील, सत्मजित माने, सागर श्रीकांत पाटील, सौरभ साळीकर, श्रावणी पाटील आणि संघवी राजवर्धन यांसह अनेक शिवप्रेमी व मान्यवर उपस्थित होते.