कोल्हापूर आय.टी. पार्कचा ताबा एमआयडीसीकडे सुपूर्त
schedule27 May 26 person by visibility 80 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूरच्या तांत्रिक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देणाऱ्या प्रस्तावित आय.टी. पार्क (माहिती तंत्रज्ञान पार्क) उभारणीच्या दृष्टीने आज एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला. मौजे कसबा करवीर (शेंडा पार्क) येथील एकूण ३४.३६ हेक्टर आर शासकीय जमिनीचा प्रत्यक्ष ताबा आज महसूल विभागाच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांकडे अधिकृतपणे सुपूर्त करण्यात आला.
जमिनीची प्रत्यक्ष मोजणी आणि सीमांकन पूर्ण करून हा ताबा देण्यात आल्याने आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या आय.टी. पार्कच्या विकासासाठी कसबा करवीर येथील गट नंबर ५८३ मधील ७.०५ हे.आर., गट नंबर ५८७ मधील १.१२ हे.आर. आणि गट नंबर ५८८ मधील २६.१९ हे.आर. अशी एकूण ३४.३६ हे.आर. जमीन एमआयडीसीला वाटप करण्यास महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १३ मार्च २०२६ रोजीच्या ज्ञापनान्वये मान्यता दिली होती. या जमिनीची कृषक दराने प्रचलित बाजारमूल्यानुसार परिगणित केलेली ५ कोटी ६० लाख २३ हजार ९८० रुपये इतकी रक्कम एमआयडीसीने ३० मार्च २०२६ रोजी शासकीय कोषागारात चलनाद्वारे जमा केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी २ एप्रिल २०२६ रोजी जमीन हस्तांतरणाचे आदेश निर्गमित केले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज या क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी व सीमांकन पूर्ण करण्यात आले. त्यानंतर महसूल विभागाच्या वतीने कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे व करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार यांनी या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख व एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांच्याकडे सुपूर्त केला.
या प्रसंगी एमआयडीसी कोल्हापूरचे उप अभियंता अजयकुमार रानगे, करवीरचे उप अधीक्षक भूमी अभिलेख किरण माने, प्रमुख भूमापक सुशेन कापरे, प्रमुख भूमापक उमेश कोष्टी, करवीरचे मंडळ अधिकारी गणेश बर्गे, करवीरचे ग्राम महसूल अधिकारी आणि करवीरचे भूकरमापक सूर्याकांत भांदिगरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेंडा पार्क परिसरातील ही जमीन आता एमआयडीसीच्या ताब्यात आल्यामुळे कोल्हापुरात अत्याधुनिक आय.टी. पार्क उभारणीच्या कामाला वेग येणार असून, यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.