कोल्हापूर महानगरपालिका : सहा.आयुक्त, उप-शहर अभियंता व 29 कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात
schedule07 Apr 25 person by visibility 77 categoryमहानगरपालिका

▪️प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून गांधी मैदान विभागीय कार्यालयाची तपासणी
कोल्हापूर : प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दुपारी 1 वाजता गांधी मैदान विभागीय कार्यालयाची अचानक तपासणी केली. यावेळी विभागीय कार्यालयात प्रभाग क्षेत्रीय अधिकारी तथा सहा.आयुक्त नेहा आकोडे, उप-शहर अभियंता महादेव फुलारी व 29 कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसलेचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज या सर्वांचे एक दिवसाचे वेतन कपात केले आहे.
शहरातील नागरीकांना महापालिकेमार्फत पुरविण्यात येणा-या अत्यावश्यक सुविधा उदा. पाणी पुरवठा, मलनि:सारण, स्वच्छता, पथदिवे, रस्ते, सांडपाणी इत्यादीबाबत वेळोवेळी येणाऱ्या तक्रारी त्वरीत सोडविण्याठी प्रभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु प्रभाग क्षेत्रीय अधिकारी विभागीय कार्यालयामध्ये उपलब्ध होत नसलेने मुख्य कार्यालयामध्ये नागरीकांना तक्रारी निराकरणासाठी यावे लागते. त्यामुळे या तक्रारी विभागीय कार्यालयस्तरावर सोडविण्याठी विभागीय कार्यालय क्र.1 ते 4 मधील सर्व प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, उप-शहर अभियंता व संबंधीत कर्मचा-यांनी दर आठवडयातील सोमवारी व मंगळवारी या दोन दिवशी सकाळचे सत्रामध्ये विभागीय कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यावेळी नागरीकांच्या येणा-या तक्रारी समक्ष विभागीय कार्यालयस्तरावरच निर्गत करण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या आहेत. परंतु आज पहिल्या सोमवारी गांधी मैदान विभागीय कार्यालयाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अचानक तपासणी केली असता प्रभाग क्षेत्रीय अधिकारी तथा सहा.आयुक्त नेहा आकोडे, उप-शहर अभियंता महादेव फुलारी व या कार्यालयातील 29 कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसलेने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.