कोल्हापुरचे सर्किट बेंचचे स्वप्न तुमच्यामुळे पूर्णत्वास गेले, सतेज पाटील यांनी मानले सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आभार
schedule17 Aug 25 person by visibility 219 categoryसामाजिक

कोल्हापूर : गेल्या ४२ वर्षांपासून कोल्हापूरसह सांगली,सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील, पक्षकार व नागरिकांचा सर्किट बेंचसाठी लढा सुरु होता. मात्र, चार दशकांच्या या लढ्याची स्वप्नपूर्ती तुमच्यामुळे आज बघायला मिळाली या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे रविवारी जाहीर आभार मानले. कोल्हापुरला सर्किट बेंच मंजूर केल्याबद्दल आमदार पाटील यांनी गवई यांचा सर्किट हाऊसवर सत्कार केला.
यावेळी आमदार पाटील यांनी सर्किट बेंचसाठी कोल्हापुरसह सहाही जिल्ह्यांतील वकील, पक्षकार, नागरिक व विविध संघटनांनी उभारलेल्या लढ्याची माहिती दिली. कोल्हापुरसाठी सर्किट बेंच हा जिव्हाळ्याचा विषय बनला होता. या बेंचमुळे सहाही जिल्ह्यातील पक्षकार व वकिलांचा वेळ, पैसा व शारीरिक त्रास वाचणार आहे.
कोल्हापुरात सुरु झालेले सर्किट बेंच हा सुवर्णक्षण आहे, त्यामुळे प्रत्येक कोल्हापुरकर आणि सहाही जिल्ह्यांतील नागरिक हा क्षण विसरुच शकत नाही. गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेली ही मागणी तुमच्या प्रयत्नामुळे शक्य झाली या शब्दांत आमदार पाटील यांनी भूषण गवई यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मकरंद कर्णिक उपस्थित होते.