कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराचे काम धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
schedule18 Aug 25 person by visibility 115 categoryराज्य

मुंबई : कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम करताना परंपरागत वास्तूंच्या संवर्धनात शासन कोणत्याही प्रकारचा तडजोडीचा मार्ग स्वीकारणार नाही. या ठिकाणी पुरातात्त्विक मूल्य आहे, स्थापत्यशास्त्रीय मूल्य आहे. हे आस्थेचे, श्रद्धेचे आणि निष्ठेचे स्थान आहे. त्यामुळे धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच मंदिर जीर्णोद्धाराची कामे केली जातील, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.
कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धार कामासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे बैठक झाली. या बैठकीस आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, धाराशिवचे जिल्हाधिकारी पुजारा, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालक डॉ.तेजस गर्गे, तसेच मंदिराचे महंत, पुजारी आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकारी श्रीलक्ष्मी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, गाभाऱ्याच्या मजबुतीकरणासोबतच धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला बाधा न आणता उपाय शोधण्यावर शासनाचा भर आहे. मंदिराच्या कळसाबाबत तसेच गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत एएसआय (पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) तज्ज्ञांची, आय.आय.टी. तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी बाह्य तज्ज्ञांची मदत घेतली जावी. याबाबतचा संपूर्ण अहवाल 30 दिवसात तात्काळ तयार करण्यात यावा, अशाही सूचना श्री.शेलार यांनी दिल्या.
दरम्यान, मंदिर परिसरातील अन्य सुरू असलेली कामे थांबविण्याची आवश्यकता नसल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी स्पष्ट केले.
कुलस्वामिनीचे हे परंपरागत, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थान आहे. त्यामुळे श्रद्धा, परंपरा आणि विज्ञान यांचा समन्वय साधत संवर्धनाची दिशा ठरवली जावी. संवाद आणि समन्वयातून या विषयावर निर्णय घेतला जावा. याबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.