गोकुळसाठी कोल्हापूरकरांचा एल्गार! ९ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात
schedule05 Nov 26 person by visibility 137 categoryराज्य
मुंबई : कोल्हापूरच्या हक्काच्या गोकुळ दूध संघावर ताबा मिळवण्यासाठी राज्य सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरोधात आणि दडपशाहीच्या निषेधार्थ येत्या ९ तारखेला सकाळी १० वाजता दसरा चौक, कोल्हापूर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली. गोकुळचा स्वाभिमान खुंटीला टांगण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
◼️मोर्चाचे मुख्य कारण आणि नेमका वाद काय?
* सत्तेसाठी कायद्याचा दुरुपयोग: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पॅनेलचे १३ डायरेक्टर निवडून आले होते, तर विरोधी महायुतीच्या ५ पक्षांचे १२ डायरेक्टर निवडून आले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कोरमचा तांत्रिक मुद्दा पुढे करत ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली.
* पूर्वlक्षी प्रभावाने नवा कायदा: न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच सरकारने कॅबिनेटचा निर्णय घेऊन नवीन अध्यादेश काढला. यानुसार चार संचालक सरकारतर्फे नियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे, जो केवळ गोकुळ जिंकण्यासाठी हा कायदा लागू केला जात आहे.
* फेडरल संस्थांवरच टाच: हा कायदा फक्त गोकुळसारख्या फेडरल इन्स्टिट्यूटलाच टार्गेट करून लागू केला जात असून याद्वारे सहकारी संस्थांचे राजकारण करण्याचे काम सरकार करत आहे.
◼️५.५ लाख दूध उत्पादक शेतकर्यांच्या संसारावर परिणाम
गोकुळ दूध संघामध्ये साडेपाच लाख शेतकरी दूध घालतात आणि याद्वारे दररोज २० लाख लिटर दूध गोळा होते. दर १० दिवसांनी शेतकऱ्यांना १०० कोटी रुपयांचे बिल मिळणारी ही देशातील एक महत्त्वाची सहकारी संस्था आहे. अशा, अमूलनंतरच्या सर्वात मोठ्या संघावर ताबा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेला मॅंडेट आणि लोकशाहीचा कौल सरकारकडून नाकारला जात आहे. राहुल गांधींनी देखील याप्रकरणी ट्विट करून शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले आहे.
◼️लोकशाहीचा अंत रोखण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा
सरकार केवळ सत्तेत बसायच्या उद्देशाने अशा प्रकारची कायदेबाजी करत आहे. उद्या हाच कायदा महापालिका असो वा गृहनिर्माण सोसायट्या (Housing Societies), कुठेही लागू केला जाऊ शकतो. मताला आणि जनादेशाला किंमत उरली नाही तर लोकशाहीचा अंत होईल, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.
न्यायालयीन लढा सुरूच राहणार असला, तरी याविरोधात रस्त्यावर उतरून देखील तीव्र संघर्ष केला जाईल. त्यामुळे कोल्हापूरचा स्वाभिमान आणि हक्क टिकवण्यासाठी ९ तारखेच्या या ऐतिहासिक संघर्ष मोर्चामध्ये तमाम कोल्हापूरकरांनी आणि दूध उत्पादकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे.
◼️मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभाग
गोकुळच्या राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी जे कायदेतज्ज्ञ आणि मंत्री या संपूर्ण षडयंत्रामागे प्रमुख भूमिकेत आहेत, त्यात मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ हे दोघे नेते मुख्यत्वे इन्स्ट्रुमेंटल (कारणीभूत) ठरले आहेत, असा थेट आरोप सतेज पाटील यांनी केला. या दोन्ही नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी पुढाकार घेऊन हा कायदा बदलण्यासाठी व गोकुळवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय व्यूहचना आखल्याचे त्यांनी स्पष्ट केले.