संकेश्वर ते आंबोली महामार्गावर गडहिंग्लज आणि आजरा गावांना बायपास रस्ता करावा, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
schedule02 Aug 25 person by visibility 627 categoryराज्य

कोल्हापूर ; राज्यसभेेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ एच अंतर्गत संकेश्वर ते आंबोली आणि पुढे बांद्यापर्यंत सिमेंट कॉंक्रिटचा उत्तम रस्ता झाला आहे. मात्र हा रस्ता गडहिंग्लज आणि आजरा या दोन गावातून जात असल्याने, वारंवार वाहतूक कोंडी होते. शिवाय पादचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना वेगवान वाहनांपासून धोका उद्भवू शकतो. त्यामुळे आजरा आणि गडहिंग्लज या दोन्ही शहरांना बायपास रस्ता तयार करावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी नामदार गडकरी यांच्याकडे केली आहे. तसेच या दोन्ही शहरातून जाणार्या महामार्गालगत सेवा वाहिन्या, पथदिवे, फुटओव्हर ब्रिज अशा सुविधा द्याव्यात, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून देशभरात रस्त्यांचे जाळे उभारले जात आहे. संकेश्वर ते आंबोली आणि पुढे सिंधुदुर्ग जिल्हयातील बांदा या गावापर्यंत, ५४८ एच या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग नुकताच पूर्ण झाला आहे. या नव्या रस्त्यामुळे कोकण आणि गोव्याला जाणे सुलभ बनले आहे. पण हा महामार्ग गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जातो. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये वारंवार वाहतूक कोंडी उद्भवत आहे. थेट शहरातून महामार्ग जात असल्याने, स्थानिक वाहतूकदारांना अडथळा निर्माण होत आहे. तर पादचारी, विद्यार्थी यांनाही महामार्गावरून जाताना अपघाताचा धोका उद्भवतो. अशा परिस्थितीत गडहिंग्लज आणि आजरा या दोन्ही शहरांना बायपास रस्ता तयार करावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे.
या बायपास रस्त्याचा आराखडा बनवण्याचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या मुंबईतील क्षेत्रीय कार्यालयात सादर करण्यात आला आहे. त्याला मंजूरी द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. तसेच सध्या गडहिंग्लज आणि आजरा या शहरातून जाणार्या महामार्गालगत पथदिवे, सेवा वाहिन्या, गटर्स अशा मुलभूत सुविधा महामार्ग प्राधिकरणाने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खासदार महाडिक यांनी नामदार गडकरी यांच्याकडे केली आहे.
गडहिंग्लज किंवा आजरा नगरपालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने, या कामांसाठी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे. त्याला नामदार नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.