माधुरी हत्ती गुजरातमधून नांदणीकडे रवाना : आमदार यड्रावकर
schedule10 Sep 26 person by visibility 158 category
◼️मठ प्रशासन, समाज व कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या प्रयत्नांना अखेर यश
नांदणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माधुरी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी घेतलेले सकारात्मक निर्णय, मठ प्रशासनाने तसेच जैन समाज आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची प्रसिद्ध महादेवी उर्फ माधुरी हत्तीण पुन्हा मठात आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून, गुजरातमधील वनतारा येथून माधुरी नांदणीकडे रवाना झाली आहे. उद्यापर्यंत माधुरी मठात दाखल होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ‘माधुरी हत्ती येणार’ हे स्वप्न आज पूर्ण होत आहे. यासाठी समाजाने आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने दाखवलेल्या संयमाबद्दल सर्वांचे आभार. महाराष्ट्र शासन व वनतारा प्रशासनाने मोलाची भूमिका बजावली. प्राणी कायद्यानुसार आवश्यक निकषांप्रमाणे माधुरीची निगा राखण्याची जबाबदारी मठ, प्राणीप्रेमी आणि सर्वांची आहे,असे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.
माधुरीच्या पुनरागमनासाठी गेल्या काही महिन्यांपासून नांदणी मठ समाजबांधव आणि प्राणी प्रेमींच्या माध्यमातून कायदेशीर, प्रशासकीय आणि तांत्रिक पातळीवर प्रयत्न सुरू होते. माधुरीचे पुनर्वसन नांदणी मठातच व्हावे, अशी सर्वांची मागणी होती. त्यासाठी मठ प्रशासनानेही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी केली. नांदणी येथे माधुरीसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांची पाहणी संबंधित समितीने केली असून, कायमस्वरूपी प्रशस्त सुविधा उभारण्याची तयारीही मठ प्रशासनाने दर्शविली आहे.
२३ जून रोजी उच्चस्तरीय समितीने समितीचे सदस्य, सेंट्रल झूचे सदस्य, महाराष्ट्र शासन व वनविभागाच्या प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन केली होती. त्यानंतर १७ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत ५ ऑगस्टपर्यंत नांदणी येथे माधुरीसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी करण्याचे आदेश संयुक्त समितीला देण्यात आले. त्यानुसार १० ऑगस्ट रोजी संयुक्त समितीने नांदणी येथे पाहणी करून अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर केला.
बुधवारी सायंकाळी माधुरीच्या पुनरागमनाबाबत ऑनलाईन सुनावणी झाली आहे.
वनतारा येथे माधुरीची प्रकृती चांगली असून, तिला नांदणी मठात परत आणावे, अशी मागणी मठाच्या वतीने करण्यात आली. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्चस्तरीय समितीने माधुरीला नांदणी येथे आणण्यास परवानगी दिली आहे.
माधुरीच्या पुनरागमनाच्या प्रक्रियेत राज्य शासनाची सकारात्मक भूमिका महत्त्वाची ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने आवश्यक प्रशासकीय बाबी आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यास सहकार्य केले. वनविभाग, जिल्हा प्रशासन, वनतारा प्रशासन आणि मठ प्रशासन यांच्यातील समन्वयातून माधुरीच्या पुनरागमनाची प्रक्रिया पुढे सरकली.
या संपूर्ण प्रक्रियेत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही शासन, वनतारा, उच्चस्तरीय समिती आणि संबंधित यंत्रणांशी सातत्याने पाठपुरावा केला. माधुरीचे पुनर्वसन नांदणी मठातच व्हावे, यासाठी त्यांनी विविध स्तरांवर समन्वय साधत प्रयत्न केले.
दरम्यान, माधुरी हत्तीणीचे माहुत वनतारा येथे पोहोचले आहेत. गुजरातमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक टीपी मिळाला असून, वाहतुकीची प्रक्रिया पूर्ण करून माधुरी नांदणीकडे रवाना झाली आहे. त्यामुळे उद्यापर्यंत माधुरी मठात दाखल होणार आहे.
माधुरीच्या पुनरागमनानंतर तिची प्राणी कायद्यातील सर्व निकषांनुसार निगा राखण्याची जबाबदारी मठ प्रशासन, प्राणीप्रेमी आणि समाजाची राहणार आहे. तसेच माधुरीला नांदणीत आणताना झालेल्या आक्रोशातून पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार यड्रावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.