मनुष्यजीवनाला मोल आहे! 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त' आत्मपरीक्षण आणि जनजागृतीची नितांत गरज
schedule10 Sep 26 person by visibility 120 category
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून १० सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. जागतिक स्तरावर जागरुकता निर्माण करणे सामाजिक कलंक कमी करणे आणि आत्महत्या टाळता येतात याची जाणीव लोकांना करुन देणे हा मुख्य उद्देश या दिवसाचा आहे.
या वर्षीची जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाची संकल्पना ’आत्महत्येवरील कथन व दृष्टीकोन बदलणे व त्याबद्दल मनमोकळेपणाने बोलणे ही आहे.
आत्महत्या म्हणजे ’स्वतःचे जीवन संपवणे.’ जेव्हा काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, सहनशक्तीची पातळी कमी होते, एखाद्या गोष्टीचा सामना करता येत नाही, ताण वाढतो, दुर्बल कौशल्य तेव्हा आत्महत्या करतात.
भारतामध्ये एका आत्महत्येच्या मागे १५ पेक्षा जास्त आत्महत्येचे प्रयत्न केलेले दिसून येतात. दर ४० सेकंदाला कोणीतरी स्वतःचे जीवन संपवत आहेत. वय वर्ष १५ ते २९ वयोगटातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे.
आत्महत्येची कारणे - स्पर्धेचे युग, वाढती आव्हाने, वाढती बेरोजगारी, कामाचा दिर्घकाळ ताण, दिर्घकालीन आजार, व्यसने, नाते संबंधातील बिघाड, प्रेमभंग, कर्जबाजारीपणा, शारीरिक मानसिक लैंगिक छळ, व्यक्तीमत्व दोष, तीव्र निराश/तीव्र मानसिक आजार इ.घटक आत्महत्येस प्रामुख्याने कारणीभूत ठरतात.
🟣 आत्महत्येची लक्षणे -
सतत निराशा जाणवणे, अतिउदासपणा, नकारात्मक विचार (आत्महत्येबद्दलचे), सतत बदलणारा मुड, एकलकोंडेपणा, व्यसनाचे प्रमाण वाढणे, जीवन व्यर्थ वाटणे, असहाय्यतेची, अपराधीपणाची आणि निरुपयोगीपणाची भावना, जीवन वैफल्यग्रस्त, हताश, निरस, झोप व भुक विस्कळीत होणे दैनंदिन सामाजिक आणि व्यावसायिक कामामध्ये अनियमता/असातत्य इ.आत्महत्येची लक्षणे आहेत.
🟣 आत्महत्येची चिन्हे -
२/३ लोक मरण्याआधी आपल्या लोकांना आत्महत्येच्या विचारांबद्दल बोलतात. स्वतःला संपवण्याची भाषा आप्तेष्टांसमोर बोललेले असतात. तसेच त्यांना धमकावतात, आत्महत्येविषयी बोलणे, लिहणे पोस्ट करणे इ. गोष्टी करतात. स्वतःला संपवण्याचे मार्ग शोधतात म्हणजेच ऑनलाईन सर्च करतात, निरोपी भाषा बोलतात, मृत्युपत्र तयार करतात.
🟣 आत्महत्या रोखण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे मदत कराल
शांतपणे समोरच्या व्यक्तीचे ऐकून घ्या (Good Listener), त्याला मन मोकळे करण्यासाठी धीर, संयम द्या, त्यांच्या संपर्कात राहा (Stay Connected). त्यांना एकटे सोडू नका (Be There).
सुरक्षित ठेवणे - किटकनाशके, हत्यारे किंवा इतर साधने आत्महत्येचे विचार असणाऱ्या लोकांपासून दुर ठेवा. मानसिक पाठबळ देणे.
आत्महत्येचे विचार येत असल्यास स्वतः काय कराल
स्वतः कठोर होऊ नका, लवचिक व्हा, भावनिक बुध्दीमत्ता वाढवणे म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दल आदर ठेवणे, मोकळेपणाने बोलणे, कुटुंबातील किंवा जवळच्या लोकांशी संवाद साधणे, नकारात्मक गोष्टी व लोकांपासून दूर राहणे, नेहमी प्रामाणिक/आशावादी/आत्मजागरुक/ व अनुकुल राहणे, परिस्थितीशी जुळवून घेणे परिस्थितीचा स्विकार करणे, योगा, प्राणायम ध्यानधारणा, माईंडफुलनेस इ.चा अवलंब करणे गरजेचे आहे. येथे संयम महत्वाचा आहे. आपल्यासाठी काय योग्य आहे, हे लक्षात यायला वेळ लागेल. स्वतःवर ताबा ठेवणे.
आत्महत्या किंवा मानसिक समस्यांबद्दल टेलिमानस (टोल नं - १४४१६/१८००८९१४४१६) या मोफत हेल्पलाईन सेवेची मदत घ्या. तसेच सेवा रुग्णालय, बावडा कोल्हापूर येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम या विभागामध्ये औषधोपचारासाठी मदत घ्यावी. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सुध्दा वरील मानसिक औषधोपचार सेवा मोफत उपलब्ध केल्या आहेत.
✍️ उदयसिंह माने
◼️चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🟣 महत्त्वाची जागतिक व राष्ट्रीय पार्श्वभूमी
* जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (World Suicide Prevention Day): समाजात मानसिक आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी जगभरात १० सप्टेंबर रोजी हा दिन पाळला जातो.
🟣 ऐतिहासिक घटना
* १८४६: अमेरिकेचे संशोधक एलियास होवे (Elias Howe) यांना शिलाई मशीनचे (Sewing Machine) पेटंट मिळाले.
* १९३९: दुसऱ्या महायुद्धादरम्यान कॅनडाने जर्मनीविरुद्ध अधिकृतपणे युद्ध पुकारले.
* १९६६: संसदेच्या मान्यतेने पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब आणि हरियाणा ही दोन नवीन राज्ये अस्तित्वात आली.
* १९७५: अमेरिकेचे 'व्हायकिंग-२' हे मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले.
* २००२: परंपरेने तटस्थ असलेला स्वित्झर्लंड देश अधिकृतपणे संयुक्त राष्ट्रसंघात (UN) सामील झाला.
🟣 जन्म / जयंती
* १८७२: 'रणजी करंडक' क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या नावाने खेळवली जाते, ते भारतीय कसोटीपटू आणि नवानगरचे राजर्षी महाराजा के. एस. रणजितसिंहजी यांचा जन्म.
* १८८७: स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री आणि उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म.
* १९१२: भारताचे ५ वे उपराष्ट्रपती आणि हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहणारे बसप्पा दानप्पा जत्ती (बी. डी. जत्ती) यांचा जन्म.
* १९४८: मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री व प्रभावी निवेदिका भक्ती बर्वे यांचा जन्म.
* १९८९: भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मनीष पांडे यांचा जन्म.
🟣 मृत्यू / पुण्यतिथी
* १९००: महात्मा फुले यांचे सहकारी आणि नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले यांचे निधन.
* १९२३: बंगाली साहित्यिक, चित्रकार आणि 'संदेश' या बालमासिकाचे संस्थापक (दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील) सुकुमार रॉय यांचे निधन.
* १९६४: हिंदुस्थानी संगीतविश्वातील प्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार श्रीधर पार्सेकर यांचे निधन.