गोकुळ निवडणुकीत महायुतीच 'मोठा भाऊ' राष्ट्रवादी; हसन मुश्रीफांचा दावा; दूध संघासह अन्य राजकीय घडामोडींवर विमानतळावर स्पष्टच बोलले
schedule11 Sep 26 person by visibility 163 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावर उतरल्यानंतर वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांशी संवाद साधताना आगामी गोकुळ दूध संघाची निवडणूक आणि राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी गोकुळ दूध संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट करत महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, गोकुळची निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. मात्र अपात्र होता होता वाचलेल्या १४२० संस्था सभासदांनी अदृश्य शक्तींसोबत जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याबाबत विचारले असता, मी आत्ताच विमानतळावर उतरलो असल्याने यावर सविस्तर माहिती नाही, चर्चेतून यावर मार्ग काढू, असे त्यांनी सांगितले. हे सगळे सदस्य महायुतीचे असताना असे का होत आहे, हे आजही मला अनाकलनीय असून याचे उत्तर अद्याप सापडलेले नाही, यातून सामंजस्याने मार्ग काढला जाईल, असे ते म्हणाले. महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ असेल असे खासदार धनंजय महाडिक सांगत आहेत, याबाबत बोलताना त्यांनी राजकारणामध्ये भाजप मोठा भाऊ असला तरी गोकुळ दूध संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट केले.
महायुतीमध्ये पालकत्वाची भूमिका तुम्हीच घेतलेली आहे या प्रश्नावर, इतर सगळे म्हणत आहेत की हसन मुश्रीफ बोलत आहेत, तर पुन्हा आपण कशाला बोला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. जागावाटपाचा तिढा कसा सोडवणार यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्व परिस्थिती सांगितली असून हा तिढा व्यवस्थित सुटेल आणि तेच यातून मार्ग काढतील, असे मुश्रीफ यांनी नमूद केले.
एमपीएससी परीक्षेतील पेपरफुटीबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी हे प्रकरण महायुती सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय गांभीर्याने घेतल्याचे सांगितले. मुलांच्या प्रतिक्रिया अत्यंत तीव्र असून, आम्ही कष्ट करतो, मरमर मरतो आणि अशा पद्धतीने अन्याय होतो अशी त्यांची भावना असल्याचे त्यांनी मान्य केले. त्यांच्या मनातील ही भावना काढून टाकण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असून, परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी आणि चुका करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी मुख्यमंत्री योग्य पाऊल उचलतील, असे ते म्हणाले. या प्रकरणी नेमलेल्या एसआयटी चौकशी समितीला आमदार रोहित पवार टाईमपास म्हणत असल्याकडे लक्ष वेधले असता, अशा प्रकरणात चौकशी समिती नेमल्याशिवाय निष्कर्ष काढता येत नाही आणि सरकारने कोणतीही कृती केली की त्यावर टीका करणे विरोधकांचे काम असून ते ते प्रामाणिकपणे करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
एकिकडे मुख्यमंत्र्यांनी साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, तर शेतकरी संघटनेचा ऊस दरावरून याला विरोध आहे, याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, गेल्या वर्षी प्रतिटनाला ३४०० रुपये दिले होते, १०० रुपये द्यायचे राहिले होते आणि अनेक कारखाने ते देत आहेत. साखरेचा वाढलेला दर कृत्रिम होता आणि दोनच दिवसांसाठी तो वाढून आता खाली आला आहे. त्यामुळे साखरेच्या दरावर ते ऊस दर मागत असतील, तर त्यांच्याशी बसून चर्चा करावी लागेल आणि कारखान्यांना याचा फारसा फायदा झालेला नाही हे समजावून सांगावे लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे कारखाने योग्य ती एफआरपी देत असून जिल्ह्यात एफआरपीची कोणतीही थकबाकी राहिलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सणासुदीच्या तोंडावर मोठी साखर टंचाई निर्माण झाल्यामुळे आणि दर ६० ते ७० रुपयांवर पोहोचल्यामुळेच सरकारला १५ ऑक्टोबरपासून साखर हंगाम सुरू करण्याचे पाऊल उचलावे लागले आहे, असे ते म्हणाले.
पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन प्रकरणाबाबत विचारले असता हे न्यायालयीन प्रकरण असून यावर बोलणे उचित ठरणार नाही, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. तसेच माधुरी हत्तीण परत येत असल्याकडे लक्ष वेधले असता, माधुरी हत्तीणीचे आपण सर्वजण मिळून स्वागत करूया आणि ज्याप्रमाणे तिचे वनतारामध्ये पालनपोषण झाले, त्याच पद्धतीने पालनपोषण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे आवाहन त्यांनी केले.