जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जुना राजवाडा कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगलतोरण; हीलरायडर्स तर्फे कार्यक्रमाचे आयोजन, ३९ वे मंगल तोरण बांधण्यात आले
schedule12 Oct 24 person by visibility 429 categoryसामाजिक

कोल्हापूर : हीलरायडर्स एडवेंचर फाउंडेशन तर्फे विजया दशमी दसरा या शुभ दिनी जुना राजवाडा कमानीस (भवानी मंडप) तांब्याच्या कलशाचे मंगलतोरण गेली ३८ वर्ष बांधले जाते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते यावर्षीचे ३९ वे तोरण बांधण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते कला शिक्षक सागर बगाडे, सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्थ सन्मती मिरजे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, अध्यक्ष प्रमोद पाटील, उदय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी व इतर मान्यवर यांनी तोरण ची विधिवत पूजा केली.
यावेळी हीलरायडर्सच्या सदस्यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. ऐतिहासिक वास्तुंचे जतन व्हावे, या मुख्य उद्देशाने ३८ वर्षापूर्वी या करविर नगरीच्या शौर्यशाली इतिहासाची साथीदार असणाऱ्या नगारखान्याच्या इमारतीची स्वच्छता करण्यात आली. ही वास्तु जतन करण्यासाठी खुप प्रयत्न करण्यात येत आहेत. ही वास्तु कोल्हापूरची ओळख आहे. या वास्तुस गेली ३८ वर्षापासून तांब्याच्या कळशाचे मंगल तोरण बांधण्याची परंपरा हिल रायडर्सच्या या सर्व परिवारांनी राखली आहे. ३८ वर्षापूर्वी केलेले हे कार्य महाराष्ट्रात ऐतिहासिक वास्तुचे संवर्धनाची खरी सुरवात होय. संस्थेचे संस्थापक प्रमोद पाटील यांच्या नेत्वृवामध्ये बिंदूचौक, खासबाग मैदान व पन्हाळा पाठोपाठ अनेक गड किल्ले स्वछता, संवर्धन मोहिम राबविण्यात आल्या. आजही हे काम जोमात सुरु आहे.
ही इमारत १८२८ ते १८३३ चे दरम्यान पाच लाख रुपये खर्च करून बांधिली. कोल्हापूरचा वारसा असलेली राज्यातील ही एकमेव इमारत आहे की जिच्यावर असलेला भगवा ध्वज कधीही शत्रूला काढण्याची हिम्मत झाली नाही. सदैव फडकत असलेला हा भगवा ध्वज कोल्हापूरची अस्मिता आहे. अशी इमारत स्वच्छ केल्यानंतर पाठोपाठ बिंदूचौक, बुरुज व पन्हाळा येथील तीन दरवाजा, अंबर खाना इतर अनेक गड किल्ले स्वच्छ करण्याची एक चळवळ सुरू झाली. राज्यात वारसा वास्तू, गड किल्ले संवर्धन या संकल्पना रुजल्या आणि आज त्या कायद्यात रूपांतर झाल्या. या कमनीला गेली ३८ वर्षापासून मंगल तोरण बांधले जात आहे. आज ३९ वे मंगल तोरण बांधले आहे.