हुतात्मा बाबू गेनू...!
schedule12 Dec 23 person by visibility 988 categoryसामाजिक

१२ डिसेंबर : हुतात्मा बाबू गेनू यांचा स्मृतीदिन. आजच्या तरुणाईला बाबू गेनू व त्यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे दिलेले हौतात्म्य याविषयी फारशी माहिती नाही, हे दुर्दैव.. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त...!
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास मोठा रोमहर्षक व अद्वितीय असा आहे. तत्कालीन अनेक निधड्या छातीच्या तरुणांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे. यामध्ये महात्मा गांधी यांच्या स्वदेशीच्या जागरणासाठी भारून गेलेल्या अवघ्या २२ वर्षाचा तरुण बाबू गेनू याचे आत्मबलीदान भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतिकारी घटना आहे. भारतातील स्वदेशीच्या पुरस्कारासाठी बलीदान दिलेली बाबू गेनू ही पहिली व्यक्ती मानली जाते.
हुतात्मा बाबू गेनू यांचा जन्म १ जानेवारी१९०८ रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळगुणे या गावी झाला.१९३० साली महात्मा गांधींजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्याचे विशेष महत्त्व आहे.
भारतभरातील लोक, वृद्ध, सुशिक्षित-अशिक्षित, ग्रामीण नागरिक सर्वांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यांनी सार्वजनिक जागेत ठिय्या मांडून विदेशी कपड्यांची होळी केली, घरी मीठ बनवुन मिठाचा कायदा मोडला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने जनतेवर प्रचंड अत्याचार केले. अनेकांना जेरबंद करण्यात आले, लाठीमार करण्यात आला आणि बंदुकाही डागण्यात आल्या. अशाप्रकारे अत्याचारामुळे परकीय राजवटीविरुद्ध भारतीयांच्या मनात तीव्र संतापाची लाट उसळली. हे पाहून २२ वर्षांचे बाबू गेनू काॅंग्रेसच्या सत्याग्रहींमध्ये सामील झाले. ते केवळ चौथीपर्यंतच शिकले होते. बाबूच्या आई-वडिलांचे त्याच्यावर खूप प्रेम होते. त्यांचे शिक्षक त्यांना रामायण, महाभारत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा सांगत असत. बाबू दहा वर्षांचेही नव्हते तेव्हा त्यांचे वडील वारले आणि कुटुंबाचा भार त्यांच्या आईवर पडला. अर्धवट शिक्षण सोडून बाबू गेनू आपल्या आईला मदत करीत असत. ते नोकरीनिमित्ताने मुंबईत आले. मुंबईच्या फिनिक्स मिलमध्ये कामाला लागले. आईला त्याचे लग्न करावे असे वाटत होते पण त्यांना भारत मातेची सेवा करायची होती, म्हणून त्यांनी लग्नास नम्रपणे नकार दिला. १९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात मिठागरावर छापा टाकणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये ते सामील झाले. ब्रिटिश सोल्जरनी त्यांना पकडून सक्तमजुरीची शिक्षा केली. तुरुंगातून सुटल्यावर ते आपल्या आईला भेटायला गेले, त्यावेळी लोकांकडून आपल्या शूर मुलाची स्तुती ऐकून आईला खूप आनंद झाला. पुढे विदेशी मालाच्या बंदीची चळवळ जोमाने सुरू झाली, त्यात ते सहभागी झाले. त्यांचें लौकिक अर्थाने शिक्षण फारच कमी झाले असले तरी, त्यांच्या अंतःकरणात देशभक्तीची अखंडपणे ज्योत तेवत होती.
१२ डिसेंबर १९३० रोजी ब्रिटीश सरकारच्या सांगण्यावरून परदेशी कापड व्यापाऱ्यांनी ट्रक भरून रस्त्यावर आणला. एकामागून एक ३० स्वातंत्र्य सेनानी ट्रकसमोर आडवे झाले आणि ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना हटवून ट्रक पुढे जाऊ दिला. बाबू गेनूने दुसरा ट्रक न सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते रस्त्यावर पडून राहिले. ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि त्यात ते चिरडले गेले, तातडीने रुग्णालयात नेले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. क्रूरकर्मा ट्रकचालक ब्रिटिश सार्जंट यांच्या क्रूरतेने ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामात हुतात्मा झाले. बाबू गेनू शहीद झाले त्या ठिकाणी मुंबईतल्या शेकडो लोकांनी रांगा लावल्या होत्या.पुढचे दोन दिवस या रस्त्यावर बाबू गेनू यांच्या रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. या घटनेनंतर स्वदेशीच्या चळवळीने उग्र रूप धारण केले. देशभरात ही चळवळ जोमाने फोफावली.बाबू गेनू देशभरात लोकप्रिय झाले. त्यांचे नाव भारतातील प्रत्येक घराघरात पोहोचले आणि "बाबू गेनू अमर रहे" चे नारे घुमू लागले.
महाळगुणे गावात त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. त्या रस्त्याला गेनू स्ट्रीट असे नाव देण्यात आले आहे. कस्तुरबा गांधी यांनी त्यांच्या घरी जाऊन संपूर्ण देशाच्या वतीने त्यांच्या आईचे सांत्वन केले. एका साध्या मुंबईतल्या मजुराने दिलेले हौतात्म्य हा देश कधीही विसरू शकत नाही.आज त्यांचा स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!
✍डॉ. सुनीलकुमार सरनाईक,
कोल्हापूर
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)