एकात्म मानवदर्शनात मानवाच्या समग्र अभ्युदयाचा विचार: डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
schedule13 Aug 25 person by visibility 224 categoryराज्य

कोल्हापूर : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानवदर्शना’मध्ये मानवाच्या समग्र अभ्युदयाचा विचार आहे, असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज येथे केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शन हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘एकात्म मानवदर्शन’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी ‘एकात्म मानवदर्शन’ या तत्त्वज्ञानामध्ये भौतिक सुखाच्या पलिकडे मानवाच्या सर्वंकष सौख्याचा विचार मांडलेला आहे. शरीर, बुद्धी, मन आणि आत्मा या सर्वांचा विचार एकाच वेळी येथे करण्यात येतो. या सर्वांच्या केंद्रस्थानी माणूस आहे. संसाधनांना प्राधान्य देणारी भांडवलवादी व्यवस्था आणि भांडवलापेक्षा माणसाच्या आर्थिक गरजांना प्राधान्य देणारी साम्यवादी व्यवस्था या दोहोंकडेही न झुकता मानवाच्या व्यापक हिताची सर्वंकष आणि मध्यममार्गी भूमिका उपाध्याय घेतात. ही भूमिका महात्मा गांधी यांच्या अंत्योदयाच्या विचाराशी जवळचे नाते सांगणारी आहे. व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांचे भान त्यात आहे. व्यक्तीगततेच्या बरोबरीनेच समाजाप्रती कर्तव्य पार पाडण्याचा आग्रहही त्यामध्ये आहे. एकूणच व्यक्ती आणि समाजाचे सक्षमीकरण त्यात अभिप्रेत आहे.
डॉ. सहस्त्रबुद्धे पुढे म्हणाले, जगा आणि जगू द्या तसेच साहचर्य हे मानवकल्याणाचे भारतीय चिंतन आहे. त्यामध्ये समाजातल्या वंचित, उपेक्षितांचे चिंतन आहे, तसेच चराचरांविषयी कृतज्ञता आहे. भारताची विविधता हे त्याचे सौंदर्य आणि ताकद आहे. ही विविधता विघटनाचे कारण न बनता एकात्मतेचे बळ बनली पाहिजे. त्या विविधतेला सामाजिक न्याय आणि स्त्री-पुरूष समानतेच्या सूत्रात गुंफले पाहिजे. प्राचीन विज्ञान व परंपरा पुढे नेत असताना या विचारांची मांडणी योग्य पद्धतीने करता आली पाहिजे. प्रामाणिकता, निष्ठा आणि परिश्रम या मूल्यांची जोड असणेही महत्त्वाची आहे. संपूर्ण जग सांस्कृतिकदृष्ट्या सपाट होत असताना आणि लोकही संकीर्णतेमध्ये अडकले असतानाच्या कालखंडात ‘स्वत्व’ टिकवून ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर ठाकले आहे. विविधतेमधील एकात्मता हेच त्याला भारतीय उत्तर असू शकते, असेही त्यांनी सांगितले.
▪️‘छत्रपती शिवाजी महाराज आद्य स्वातंत्र्यसेनानी’
छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे, शूरवीर तर होतेच; पण, त्याही पलिकडे जाऊन ते एक दूरदर्शी राजे होते. या देशामध्ये स्वराज्याची प्रेरणा चेतविणारे आद्य स्वातंत्र्यसेनानी होते. त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहायला हवे. स्वदेशी, स्वभूषा आणि स्वभाषा या माध्यमातून या देशाला विकासाची स्वदृष्टी प्रदान करणारे ते महान छत्रपती होते. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी सांगितल्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधी सन १६२८मध्ये मराठीचा लोकवापर अवघा १४ टक्के होता. महाराजांच्या काळात सन १६७४मध्ये तो ६२ टक्क्यांवर गेला आणि त्यानंतरच्या कालखंडात सरकारी वापरात ९३ टक्के इतका झाला. अशा तऱ्हेने छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषासमृद्धीचा पाया घातल्याचेही डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, एकात्म मानवदर्शन या व्यापक संकल्पनेविषयी अनभिज्ञता आहे. त्या संदर्भातील योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन सदर व्याख्यानाची एक महिन्याच्या आत पुस्तिका तयार करण्यात येईल. तसेच या अनुषंगाने निबंध स्पर्धांसह विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येईल. डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्याकडे एकात्म विचार करण्याची विशिष्ट पद्धती असून त्याचा विद्यापीठाने वेळोवेळी अनुभव घेतला आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कालखंडात विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांशी त्यांनी साधलेला संवाद अविस्मरणीय स्वरुपाचा होता. ज्यांच्यापर्यंत अद्याप कोणीही पोहोचलेले नाही, अशा समाजघटकांपर्यंत, अशा देशांतील विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचले पाहिजे, हा त्यांचा संदेश अत्यंत मूलभूत स्वरुपाचा ठरला.
यावेळी डॉ. राजाराम गुरव यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, आजीवन अध्ययन विभागाचे डॉ. रामचंद्र पवार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. सुखदेव उंदरे, व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, संजय परमणे, मनोज पाटील, विनिता तेलंग, रतन कांबळे यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.