दक्षिण महाराष्ट्रात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी लोकप्रतिनिधींची बैठक घेणार
schedule11 Dec 25 person by visibility 50 categoryराज्य
▪️उदय सामंत यांचे आश्वासन : सतेज पाटील यांनी केली होती मागणी
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा हे भौगोलिक दृष्ट्या एकत्र आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाचे असलेल्या जिल्ह्यांत औद्योगिक कॅरिडॉर विकसित होऊ शकतो. राज्याच्या तिजोरीत अधिक महसूल देणारे ही जिल्हे असल्याने ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी) संदर्भात धोरण ठरवत असताना या तीन जिल्ह्यांचा विचार करावा अशी मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी विधीमंडळात केली. यावर उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी जीसीसी संदर्भात या तिन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, सध्या देशातील इतर राज्ये ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स संदर्भात धोरण आखत आहेत. सर्वात जास्त जीसीसी असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यांचा नेहमी यासाठी उल्लेख होतो. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे भौगोलिक दृष्ट्या एकत्र आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाचे असलेल्या जिल्ह्यांत औद्योगिक कॅरिडॉर विकसित होऊ शकतो. या तिन्ही जिल्ह्यांची औद्योगिक क्षमता मोठी असून उद्योग, आयटीसाठी लागणारे मनुष्यबळ, कृषी उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योग दळणवळणाच्या सोई, यांमुळे जीसीसीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे हे धोरण ठरवत असताना या तीन जिल्ह्यांचा विचार करावा. यावर मंत्री सामंत यांनी तिन्ही जिल्ह्यांचे महत्व अधोरेखित करत जीसीसीबरोबरच आयटी पार्क संदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच या तिन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची एक विस्तारित बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.