थकबाकीदार व अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर महापालिकेची कारवाई
schedule20 Aug 26 person by visibility 170 categoryमहानगरपालिका
◼️पहिल्यांदा 25 हजारांचा दंड; पुन्हा अनधिकृत कनेक्शन आढळल्यास फौजदारी गुन्हा
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभाग व उपद्रव शोध पथकामार्फत शहर व संलग्न ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनधिकृत नळ कनेक्शनधारकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अनधिकृत नळ कनेक्शन आढळल्यास प्रथम 25 हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असून, त्यानंतर पुन्हा बेकायदेशीर कनेक्शन आढळल्यास संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या संकल्पनेतून उपद्रव शोध पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाची वसुली वाढविणे, पाणी चोरी, बेकायदेशीर नळ कनेक्शन तसेच मोटरीद्वारे होणारी पाणी चोरी शोधून त्यावर प्रभावी कारवाई करणे हा या पथकाचा प्रमुख उद्देश आहे. या पथकामध्ये सेवानिवृत्त लष्करी जवानांचा समावेश असून, शहरात दररोज शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत आज बेलबाग व मंगळवार पेठ परिसरात मोठ्या थकबाकीदार नळ कनेक्शनधारकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी तीन थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. महापालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन घेतलेल्या तसेच पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या नागरिकांनी आपली थकबाकी तातडीने भरून नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे असे आवाहन केले आहे. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता नळ कनेक्शन खंडित करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
सदर कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशाने तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये शाखा अभियंता महानंदा सूर्यवंशी, मीटर रीडर वसंत गायकवाड, पथक कर्मचारी अरुण प्रभावळे, बाबासाहेब पठाण, भूपाल कुंभार, प्रवीण वरेकर, मुकुंद माने, प्रितेश रणवरे, संभाजी रूईकर व वसंत गायकवाड यांनी सहभाग घेतला.
महापालिकेचे आवाहन : पाणीपट्टीची थकबाकी तातडीने भरावी तसेच अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. पाणी चोरी व बेकायदेशीर नळ कनेक्शनला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन देऊ नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.