‘गोकुळ’मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा; डॉ. कुरियन यांना अभिवादन
schedule26 Nov 25 person by visibility 46 categoryउद्योग
कोल्हापूर : राष्ट्रीय दुग्ध दिन आणि श्वेतक्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात आज अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे व सामाजिक कार्य क्षेत्रातील अनुभवी शिक्षणतज्ञ डॉ. सोनिया राजपूत यांच्या हस्ते डॉ. कुरियन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. कुरियन यांनी देशाच्या दुग्ध क्रांतीत दिलेले योगदान आणि ऑपरेशन फ्लड योजनेद्वारे भारताला दुग्ध उत्पादनात अग्रस्थानी नेण्यामागील त्यांची दूरदृष्टी याचे स्मरण करण्यात आले.
यावेळी बोलताना संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले, “गोकुळच्या उभारणीत व जडणघडणीत डॉ. कुरियन यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. २०१४ पासून देशात राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा होत आहे. सहकारावर आधारित संस्थांना बळ देण्याचा त्यांनी दिलेला संदेश आजही गोकुळच्या कार्यपद्धतीचा पाया आहे. त्यांच्या विचारांमुळेच गोकुळची आर्थिक स्थिती नेहमी भक्कम राहिली आहे.”
यासोबतच २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, सामाजिक कार्य क्षेत्रातील अनुभवी शिक्षणतज्ञ डॉ.सोनिया राजपूत, संघाचे व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.प्रकाश साळुंके, व्यवस्थापक संकलन शरद तुरबेकर, दत्तात्रय वागरे, धनाजी पाटील, कृष्णात आमते, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.व्ही.डी.पाटील, डॉ.दयावर्धन कामत, बाजीराव मुडकशिवाले, महिला नेतृत्व विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.