ग्रामपंचायत नंदगावमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न
schedule01 Apr 25 person by visibility 201 categoryशैक्षणिक

कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन 2024-25 मधील विशेष निवासी श्रम संस्कार शिबिर दिनांक 24 ते 30 मार्च 2025 या दरम्यान ग्रामपंचायत नंदगाव येथे संपन्न झाले.
शिबिरा अंतर्गत ग्रामपंचायत नंदगाव येथील सार्वजनिक ठिकाणची तांत्रिक कामे मोफत करुन देण्यात आली. स्मशानभूमी नंदगावमध्ये स्वच्छता तसेच रंगकाम, कुपनलिका दुरुस्ती व नवीन, पाण्याची टाकी बसवणे व बांधकाम, स्मशानातील कार्य पूर्ण झाल्यानंतर हात पाय धुण्याची व्यवस्था तसेच स्मशानाच्या भिंतीवर सुविचार लिहिण्यात आले. विद्यामंदिर नंदगाव येथे क्रीडांगण स्वच्छता, परसबागेचे बांधकाम, लोखंडी दरवाजा तसेच फॅब्रिकेशन, बेंच दुरुस्ती, क्लासरुम, विद्युत दुरुस्ती व नवीन वायरिंग, अंगणवाडीमध्ये नवीन विद्युत फिटिंग अशी तांत्रिक स्वरुपाची कामे करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र, नंदगाव येथे जीर्ण अवस्थेत असलेले 40 वर्षापूर्वीचे लाईट फिटिंग काढून पूर्ण दवाखान्यास नवीन लाईट फिटिंग करण्यात आले. तसेच लोखंडी मुख्य दरवाजा बनवण्यात आला व लोखंडी कमान करण्यात आली.
दत्तमंदिर नंदगाव परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच रंगकाम, व लोखंडी नवीन शेड उभारले, जळालेले विद्युत बोर्ड काढून नवीन विद्युत बोर्ड बसवण्यात आले .
श्रीराम मंदिर नंदगाव येथे परिसर स्वच्छता व मंदिराचे आतून बाहेरुन संपूर्ण रंगकाम करण्यात आले. ग्रामपंचायत नंदगाव येथील रस्ते व परिसर ग्रामस्वच्छता अंतर्गत स्वच्छ करण्यात आला.
मोठ्या उत्साहात शिबीराचा समारोप करण्यात आला. यावेळी अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य एम.एस.आवटे तसेच कार्यालयीन अधीक्षक एस.के.पार्ले, नंदगाव ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .
स्वयंसेवकांचे कौतुक करताना त्यांनी कामाचा आढावा घेऊन सर्वसाधारण चार लाखापर्यंतची कामे मोफत करण्यात आल्याचे सांगितले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सकाळ सत्रामध्ये श्रमदान करण्यात आले, तर दुपार सत्रामध्ये श्रमसंस्कार करण्यात आले. या श्रमसंस्कारामध्ये कथा कथन व समाजभान व्यक्तिमत्व, नीतिमूल्य या विषयी डी.टी.कांबळे व ए.पी.कांबळे, निदेशक,औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी मार्गदर्शन केले. जैवविविधता संवर्धन याविषयी सुहास वायंगणकर यांनी मार्गदर्शन केले.
योग व योगाभ्यास स्वयंसेवकांच्या दररोजच्या जीवनातला अविभाज्य घटक व्हावा व भविष्यात त्यांची उत्कृष्ट प्रकृती रहावी यासाठी योगाचे सखोल ज्ञान असलेले माऊली योग वर्गाच्या योगशिक्षकांनी मार्गदर्शन केले. नंदगावात प्रामुख्याने शेती व्यवसाय केला जातो, त्याचबरोबर शेती पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते, या दुग्ध व्यवसायामुळे गावातील ग्रामस्थांना आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते, त्यासाठी त्यांच्या जनावरांना येणारी रोगराई व चारा व्यवस्थापन तसेच त्यांचा भाकड काळ या विषयी गोकुळ संघाचे डॉ. एम.पी.पाटील व डॉ.टी.एस.कडवेकर यांनी स्वयंसेवकांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच पशुसंवर्धन विषयी असलेल्या प्रश्नांचे निराकरण केले.
आपले आरोग्य आपली जबाबदारी या विषयांतर्गत इस्पुर्लीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता अग्रवाल यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर कार्यक्रम अधिकारी एस. एस. माने व ए. एस.पोवार यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमास विद्युत दुरुस्तीसाठी ए. एम. रसाळ, फॅब्रिकेशनसाठी एम. जे. भोसले, के. एस. माळी, प्लंबिंगसाठी ए. एन. क्षीरसागर, बांधकामसाठी व्ही. पी. सुतार, दैनंदिन योगसाठी एस.एन.कदम उपस्थित होते. या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
समारोपाच्या वेळी प्राचार्यांनी गावकऱ्यांना आयटीआय विषयी व आयटीआयमध्ये शिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कोर्सेस विषयी माहिती करुन दिली. तसेच, ग्रामस्थांना आयटीआय प्रवेशासाठी मार्गदर्शन केले व श्रमदानातून नंदगाव गावातील तांत्रिक स्वरुपाची कामे केल्याबद्दल स्वयंसेवकांचे कौतुक केले.
कार्यालयीन अधीक्षक एस. के. पार्ले यांनी ग्रामस्थांना केलेल्या कामाचा आढावा व शेतीपूरक व्यवसायासाठी गावकऱ्यांनी श्रमसंस्कार या कार्यक्रमास उपस्थित राहून गावच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागावा, यासाठी आयोजित केलेल्या दुग्ध व्यवसायास उपस्थित राहून भविष्यात त्याचे अनुकरण होईल याविषयी गावकऱ्यांचे आभार मानले. तसेच स्वयंसेवकाने केलेल्या तांत्रिक कामाविषयी त्यांचे कौतुक केले.
ग्रामपंचायत नंदगाव येथील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत मार्फत संस्थेस सन्मानचिन्ह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या स्टाफ सहित स्वयंसेवकांना फेटे घालून सन्मानित करण्यात आले.