‘गोकुळ’च्या वासरू संगोपनातून दुग्ध व्यवसायास नवे बळ : नविद मुश्रीफ
schedule07 Jul 25 person by visibility 596 categoryउद्योग

कोल्हापूर : दुग्ध व्यवसायाचा पाया बळकट करण्यासाठी गोठा व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि स्थानिक स्तरावर पशुधनाची गुणवत्ता या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. "प्रगत गोठा, समृद्ध गोकुळ" ही या संकल्पनेतून गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सुरुपली (ता. कागल) परिसरातील गोकुळ संलग्न प्रगतशील दूध उत्पादक, गोठा भेट कार्यक्रमाअंतर्गत शहाजी पांडुरंग पाटील यांच्या गोठ्याला भेट दिली. यावेळी संघाचे अधिकारी, संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक उपस्थित होते.
यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “जातिवंत रेड्या-पाड्यांची वाढ आपल्या गोठ्यांमध्येच होणे ही दुग्ध व्यवसायासाठी मोठी गोष्ट आहे. बाहेरून जनावरे खरेदी करण्याऐवजी आपल्या पशुधनाची गुणवत्ता स्थानिक पातळीवर वाढवणे हे गोकुळचे उद्दिष्ट आहे. तसेच गोठा चांगला असेल, जनावरांची योग्य काळजी, स्वच्छता, योग्य आहार, संगोपन आणि मोकळं वातावरण असेल, तरच जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. म्हणूनच, गोकुळकडून 'मुक्त गोठा' हि संकल्पना राबवली जात आहे. यासाठी संघाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘वासरू संगोपन’ व ‘मुक्त गोठा’ या योजनेमध्ये सहभाग घ्यावा व दूध वाढीस हातभार लावावा.
या गोठा भेटीत गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, बिद्री साखर कारखान्याचे संचालक रंगराव पाटील, विकासराव पाटील, निलेश शिंदे, मयूर आवळेकर, बाळासो लाटकर, पी. जे. पाटील, बी. एस. पाटील तसेच गोकुळचे विस्तार अधिकारी राहुल घाटगे व रणजित शिंदे उपस्थित होते.