शिर्डी विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना सुरुवात
schedule31 Mar 25 person by visibility 252 categoryराज्य

मुंबई : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ही ऐतिहासिक सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि संबंधित नियामक संस्थांच्या प्रयत्नांमुळे शिर्डीतील हवाई वाहतूक सेवा नव्या उंचीवर पोहोचली आहे.
या नव्या टप्प्याचा लाभ यात्रेकरूंना तसेच पर्यटकांना होणार असून, इंडिगो एअरलाइन्सने सेवेत दोन नवीन विमानांची भर घातली आहे. विशेषतः, हैदराबाद-शिर्डी-हैदराबाद मार्गावर 78 प्रवाशांच्या क्षमतेचे नियमित विमान सुरू करण्यात आले आहे. ही सेवा गुढीपाडवा आणि उगादीच्या शुभप्रसंगी यात्रेकरूंना भेट म्हणून सुरू करण्यात आली आहे.
या विस्तारामुळे शिर्डी विमानतळ दररोज एकूण 11 विमानांची (22 हालचाली) हाताळणी करेल, ज्याद्वारे दररोज सुमारे 2200 प्रवाशांना सेवा देण्यात येईल. हे पायाभूत सुविधा आणि हवाई वाहतूक क्षेत्रासाठी मोठे यश मानले जात आहे.
श्री साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि पहाटे 4 वाजता होणाऱ्या काकड आरतीला उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. अनेक विमान कंपन्यांनीही शिर्डीसाठी अधिक सेवा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शिर्डी विमानतळावर रात्रीच्या कालावधीत विमानसेवा सुरू होणे हे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले आहे.
या ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलताना, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सांगितले की, ही सुविधा केवळ हवाई वाहतूक क्षेत्रासाठीच नाही, तर धार्मिक पर्यटनालाही चालना देण्यासही मदत करणारी ठरेल. शिर्डीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भविष्यात येथे आणखी सेवा उपलब्ध करून दिल्या जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.