कोणताही घटक शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही : सभापती श्रद्धाताई गायकवाड
schedule18 May 26 person by visibility 108 categoryराज्य
◼️समाज कल्याण विभागाची ‘जागर यात्रा’ हेरवाडमध्ये उत्साहात
हेरवाड : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाची जागर यात्रा ही मोहिम गावोगावी राबविली जात असून शिक्षण, महिला सक्षमीकरण, उद्योग, दिव्यांग कल्याण तसेच मागासवर्गीय समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्ध असून गावातील एकही पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहू दिला जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती श्रध्दाताई गायकवाड यांनी दिली.
हेरवाड येथे समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “समाज कल्याण विभागाची जागर यात्रा” या विशेष मार्गदर्शन बैठकीत समाजकल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड बोलत होत्या.
सभापती श्रद्धाताई गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजातील दुर्बल, आर्थिकदृष्ट्या मागास, महिला, युवक, विद्यार्थी आणि दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी “जागर यात्रा” हा उपक्रम प्रभावी माध्यम ठरत आहे. शासन अनेक लोककल्याणकारी योजना राबवत असले तरी माहितीअभावी अनेक पात्र लाभार्थी त्यापासून वंचित राहतात. ही दरी कमी करण्यासाठी गावागावात प्रत्यक्ष जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य, महिलांसाठी स्वयंरोजगार योजना, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा तसेच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हीच या अभियानामागील भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे खारगे यांनी समाज कल्याण विभाग तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
यावेळी पोलिस दलात भरती झालेले संकेत अपराज, दीक्षांत कांबळे, रेवती पाटील, सागर पाटील तसेच भारतीय सैन्य दलात निवड झालेले धनाजी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश मिळविलेल्या भूमिका मोहिते हिचाही गौरव करण्यात आला. तसेच “समाज कल्याण विभागाची जागर यात्रा” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, सरपंच रेखा जाधव, दिलीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड, माजी सभापती सुवर्णा अपराज, बंडू बरगाले, अर्जुन जाधव, रावसाहेब पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन अनिल खोत यांनी केले. आभार सरपंच रेखा जाधव यांनी मानले.