हुपरी-कोल्हापूर मार्गावरील रखडलेल्या पुलाचे काम तात्काळ पूर्ण करा; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा
schedule29 Sep 26 person by visibility 73 categoryराजकीय
कोल्हापूर : हुपरी-कोल्हापूर या अत्यंत वर्दळीच्या मुख्य राज्य मार्गावरील उचगांव यादववाडी ओढ्याच्या पुलाचे बांधकाम मागील काही दिवसांपासून अर्धवट व बंद अवस्थेत आहे. यामुळे शाळकरी मुले, नागरिक, कामगार आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मार्गावर अवजड वाहनांची मोठी रहदारी असते आणि वळण लक्षात न आल्याने वारंवार अपघात होत आहेत. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण न केल्यास हुपरी-कोल्हापूर रस्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी तालुकाप्रमुख राजू यादव व उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांनी दिला.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता अमोल कोळी यांनी सध्या पुलाचे काम बंद असले तरी ते तातडीने सुरू करण्याबाबत ठेकेदाराला सूचना देऊन काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
या निवेदनावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, फेरीवले संघटना उपतालुकाप्रमुख बाळासो नलवडे, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, युवा सेना समन्वयक सचिन नागटिळक, दिलीप देसाई, अजित चव्हाण, प्रकाश मुदुगडे, कृष्णात तुरुके,सुनील पारपाणी, बाबुराव पाटील, रामराव पाटील आदि शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.