पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील : मंत्री ॲड. आशिष शेलार
schedule27 Apr 25 person by visibility 176 categoryराज्य

▪️महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
मुंबई : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गुणवत्ताधारक खेळाडू निश्चितच घडतील. तसेच पालिकेच्या प्रयत्नांमुळे या खेळाडूंना चांगल्या संधी नक्की मिळतील, असा विश्वास माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
पनवेल महापालिकेच्या नवीन पनवेल येथील नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री दिलीप वेंगसरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, सिडकोचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, दिलीप वेंगसरकर यांच्या सारख्या जाणकार क्रिकेटपटूंकडून प्रशिक्षण घेऊन या अकादमीतून उत्तम खेळाडू घडतील.
खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, दिलीप वेंगसरकर यांच्या सारख्या जाणकार क्रिकेटपटूंकडून प्रशिक्षण घेऊन या अकादमीतून उत्तम खेळाडू घडतील.
यावेळी पद्मश्री दिलीप वेंगसरकर म्हणाले, पनवेल कार्यक्षेत्रात क्रिकेट खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता दिसून येते. या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे त्यांना मोठे व्यासपीठ मिळेल आणि इथले खेळाडू भविष्यात भारतीय क्रिकेट संघातून खेळताना दिसतील.
आयुक्त व प्रशासक मंगेश चितळे यांनी सांगितले की, हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र साडेसात एकर क्षेत्रावर साकारले असून यासाठी १४ कोटी ५५ लाख रुपये खर्च झाले आहेत. १५० मीटर व्यासाचे क्रिकेट मैदान, पॅव्हेलियन इमारत आणि इतर आवश्यक सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत. दरवर्षी १० ते १९ वयोगटातील १०१ विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील ५० टक्के, उर्वरित रायगड जिल्ह्यासाठी २५ टक्के आणि जिल्ह्याबाहेरील २५ टक्के असा कोटा निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी या अकादमीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.