किटकनाशके साठा व विक्री, घरगुती किटकनाशके साठा व विक्री परवाने बंधनकारक
schedule26 Dec 25 person by visibility 72 categoryराज्य
▪️ किटकनाशके फवारणी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) परवाना घेणे बंधनकारक
मुंबई : कृषी विभागाकडून मुंबई शहर,मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये किटकनाशके साठा विक्री व घरगुती किटकनाशके विक्री परवाने देण्यात येतात. किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) कृषी विभागाचा परवाना असणे बंधनकारक आहे. परंतु शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, अनेक विक्रेते घरगुती किटकनाशके विक्री (मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकाने, सुपर मार्केट, बझार इत्यादी) विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. तरी मुंबई शहर,मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये सर्व विक्रेत्यांनी किटकनाशके साठा विक्री (घाऊक व किरकोळ), घरगुती किटकनाशके विक्री व किटकनाशके फवारणी करणेसाठी त्वरीत परवाने घेण्याचे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या किटकनाशके कायदा १९६८ व किटकनाशके नियम १९७१ अन्यये किटकनाशके साठा व विक्री (घाऊक व किरकोळ), घरगुती किटकनाशके विक्री व किटकनाशके फवारणी करण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. घरगुती किटकनाशके साठा व विक्रीचे परवाने किटकनाशक नियमानुसार कायमस्वरुपी देण्यात येतात. परवान्यांमधील उगम प्रमाणपत्रे व्यपगत झाल्यास परवान्यामध्ये समाविष्ट करुन घेणे गरजेचे आहे. तसेच प्रतिबंधित किटकनाशके वापरासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना व्यवसाय करणे किटकनाशके अधिनियम १९७१ चा नियम १० चे उल्लंघन आहे.
विनापरवाना किटकनाशके, घरगुती वापरासाठीची (उदा. झुरळ, उंदीर, ढेकूण, मच्छर, डास, मुंग्या इत्यादी नियंत्रण) किटकनाशके यांचा साठा व विक्री तसेच पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स करणाऱ्या विक्रेते व व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेस आहे. तरी मुंबई शहर,मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांतील सर्व विक्रेत्यांनी किटकनाशके साठा च विक्री (घाऊक व किरकोळ), घरगुती किटकनाशके विक्री व किटकनाशके फवारणी करणेसाठी परवाने त्वरित घ्यावेत व कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे, ७वा मजला, धर्मवीर आनंद प्रशासकीय इमारत, कशीश पार्क, एल.बी.एस मार्ग, तीन हात नाक्याजवळ, ठाणे (पश्चिम) ४००६०४ संपर्क क्रमांक ८६९१०५८०९४ येथे संपर्क साधावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांनी केले आहे.





