महाराष्ट्रात उद्या २५ डिसेंबर रोजी गिग कामगारांचा संप
schedule24 Dec 25 person by visibility 175 categoryराज्य
कोल्हापुर : छत्रपती संभाजीनगर येथील झोमॅटो कंपनीतील गिग कामगार, रायडर्स व डिलिव्हरी कर्मचारी २२ डिसेंबर २०२५ पासून संपावर आहेत. कामगारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर विभागीय सहाय्यक कामगार आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
झोमॅटो व इतर अॅप-आधारित कंपन्या गिग कामगारांना “भागीदार” म्हणवून घेत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांना किमान वेतन, योग्य मोबदला तसेच भविष्य निर्वाह निधी (PF), कर्मचारी राज्य विमा योजना (ESI) यांसारख्या मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत, असा कामगारांचा आरोप आहे.
कामगार विभागाने झोमॅटो कंपनीच्या अधिकाऱ्यांना २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले होते; मात्र कंपनीचे प्रतिनिधी गैरहजर राहिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील गिग कामगारांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील सर्व गिग कामगार २५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यव्यापी संप पुकारणार असून या दिवशी डिलिव्हरी सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. गिग वर्कर्स युनियनने सर्व गिग कामगारांना या संपात सहभागी होऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
🔸मुख्य मागण्या:
▪️अॅप-आधारित कंपन्यांवर शासनाने नियंत्रण व नियमन करावे
▪️डिलिव्हरीसाठी प्रति किलोमीटर किमान ₹१५ दर निश्चित करावा
▪️किमान वेतनाची हमी द्यावी
▪️सामाजिक सुरक्षा व आरोग्य विमा सुविधा द्याव्यात
▪️कामाचे तास व विश्रांती कालावधीचे नियमन करावे
▪️गिग कामगारांच्या हक्कांचे कायदेशीर संरक्षण करावे
🔸इतर संबंधित मागण्या
▪️प्लॅटफॉर्म अॅप-आधारित व इतर वाणिज्य कामगार संघटना, जनपहल जनरल वर्कर्स युनियन, इंडियन लेबर फेडरेशन तसेच ॲमेझॉन इंडिया लेबर युनियन यांसह अनेक संघटनांनी या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे.
▪️सीएटीचे राष्ट्रीय मंत्री व ऑल इंडिया फूड ऑइल ट्रेडर्स फेडरेशनचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनीही या संपाला पाठिंबा दर्शवित, डिलिव्हरी कर्मचारी व गिग कामगारांचे शोषण करणाऱ्या कंपनांना धडा शिकवला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.





