प्रजाहितदक्ष : अहिल्याबाई होळकर
schedule10 Mar 24 person by visibility 364 categoryसंपादकीय
आज रविवार दिनांक १० मार्च रोजी कोल्हापूर येथे प्रजाहितदक्ष अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे, त्या निमित्ताने..
अहिल्याबाईंचे नाव आजही अखिल भारत वर्षामध्ये घेतले जाते. याला महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी बांधलेल्या मंदिरांमुळे, घाटांमुळे, धर्मशाळा व अन्नछत्रांमुळे. जेथे जेथे, तीर्थक्षेत्र आहे तेथे तेथे अहिल्याबाईंची स्मृती जागृत आहे. त्यांनी आपल्या संस्थानात रयतेला योग्य न्याय दिला होता. त्यांनी शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपल्या जनतेला मोठा आधार दिला होता. त्या मागे त्यांची धार्मिकता, भूतदया, परोपकाराची वृत्ती महत्त्वाची होती. त्यांना स्वत:ची स्तुती केलेली आवडत नसे. एकदा एका विद्वान पंडिताने त्यांच्या चरित्रावर स्तुतीपर ग्रंथ लिहून दरबारात त्यांच्यापुढे वाचून दाखविला. त्यांनी ते सर्व ऐकून घेतले व नंतर त्या विद्वान पंडिताला सांगितले की, मी एक केवळ अबला आहे, माझी इतकी स्तुती करण्याइतके मी काही केलेले नाही. तुम्ही ग्रंथ रचनेसाठी जेवढे श्रम घेतलात यापेक्षा परमेश्वराची स्तुती करणारा ग्रंथ रचला असता तर बरे झाले असते. त्यामुळे तुमचाही गौरव झाला असता आणि वाचकांनाही आनंद वाटला असता. बरे असो, स्तुती जगभर व्हावी, असे मला वाटत नाही. ग्रंथ नर्मदा नदीमध्ये बुडवून टाका! असे म्हणून त्या विद्वानाला तो ग्रंथ नदीत टाकण्यास सांगितला. यावरून त्यांचा थोरपणा दृष्टीक्षेपात येतो. त्यांच्या न्यायीपणाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. एका श्रीमंत विधवेने आपणास दत्तक घेण्यास परवानगी मागितली होती. त्या वेळी त्या असहाय्य विधवेला त्यांनी योग्य न्याय दिला.
त्या प्रसंगी त्यांच्या दिवाणाने अहिल्याबाईंना त्या बाईकडून ती श्रीमंत असलेने भरपूर पैसे घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु अहिल्याबाईनी त्याला साफ नकार दिला व तिच्या अर्जाप्रमाणे ’दत्तक घेण्यास परवानगी दिली व तिला तसे पत्र पाठविले. दत्तक घेण्याचा तुमचा विचार आम्हास पूर्ण पसंत आहे. दानधर्माचे बाबतीत तुमच्या यजमानाचा लौकिक चालत आहे. तो सांभाळून असावे म्हणजे सरकारास यापेक्षा जास्त संतोष होईल. तुमच्या दौलतीच्या तुम्ही मालक आहात तुम्ही खुशाल दत्तक घ्यावा, याकामी सरकारात नजर करण्याची काही जरूर नाही. यावरून अहिल्याबाईंच्या न्यायीपणाचा लौकिक सर्वत्र पसरला.
अशा या मराठ्यांच्या इतिहासातील थोर स्त्रीचा जन्म सन १७३५ मध्ये महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील चोंडी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे असे होते. ते जातीने धनगर समाजाचे असून त्यांच्याकडे चोंडी गावची पाटीलकी होती. सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह झाला. मल्हारराव होळकर हे थोरले बाजीरावाच्या काळात स्वकर्तृत्वाने इंदूर प्रांताचे सुभेदार बनले होते. परंतु त्यांचा एकुलता एक मुलगा खंडेराव हा व्यसनी निघाल्याने अहिल्याबाईंचे संसारी जीवन तसे निराशमय होते. त्यातच त्यांना दोन मुले (एक मुलगा व एक मुलगी) झाली. मल्हारराव अतिशय शूर होते. तसेच स्वामीभक्त, उदार व धार्मिक वृत्तीचे होते. त्यांचा आधार अहिल्याबाईंना होता. तसेच सासू गौतमाबाई याही परोपकारी तसेच धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनीही अहिल्याबाईना मोठे मार्गदर्शन केले होते. त्यांच्याकडूनच अहिल्याबाईंनी धार्मिक विचार घेतले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. सन १७५४ मध्ये खंडेराव हे सूरजमल जाटाबरोबर झालेल्या लढाईत मारले गेले. त्यामुळे अगदी तरुण वयात विधवापणाची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली. त्या वेळेस त्या सती जाण्यास तयार झाल्या होत्या. परंतु सासरे मल्हाररावांनी संस्थान सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली व सती न जाण्यापासून परावृत्त केले. त्यांनीही त्याला मान्यता दिली.
मल्हारराव कित्येकदा पेशव्यांच्याबरोबर युद्धात सहभागी होत असत. त्या वेळी इंदूर संस्थानाची त्यांनी व्यवस्थित जबाबदारी संभाळली होती. कर्तबगार सासरे व धार्मिक वर्तनाची सासू गौतमाबाई यांच्या सहवासाने अहिल्याबाईंचे व्यक्तिमत्त्व उमलत होते. मल्हाररावांनी सुनेला प्रशासकीय कामात तरबेज केले होते. ते मोहिमेवर गेल्यावर पत्राद्वारे घराच्या कामाबद्दल, वसुली, फौजेची व्यवस्था, शत्रूच्या हालचालीविषयी कळवत असत. तीही त्यांच्या पत्राद्वारे सूचना अंमलात आणत असे. पुढे सन १७६६मध्ये मल्हाररावांचाही मृत्यू झाला त्या वेळी मात्र अहिल्याबाईंच्यावर मोठा आघात झाला. कारण संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर पडली गेली. त्या वेळी संस्थानाचे वार्षिक उत्पन्न ७४ लाख रुपये इतके होते. मल्हाररावांच्या मृत्यूच्यावेळी १६ लाखांची रोकड तिजोरीत होती. मल्हाररावानंतर आहिल्याबाईंनी आपला मुलगा मालेराव यांना सरदारकीची वस्त्रे घातली, परंतु तोही राज्यकारभारासाठी नालायक व कर्तृत्वशून्य निघाला. तो वेडसर, व्यसनी व विलासी निघाला. त्याने कसाबसा आठ ते दहा महिने कारभार पाहिला व तोही वयाच्या २२व्या वर्षी मरण पावला.
त्यामुळे अहिल्याबाईंच्यावर आणखी एक आघात झाला. त्यानंतर अहिल्याबाईंनी आपल्यातील आप्त तुकोजी होळकरांना आपल्या सासूबाईंना दत्तक घ्यावयास लावला व तुकोजीकडे फौजेची सर्व व्यवस्था देऊन आपल्या संस्थानाचे संरक्षण करण्याचा निर्धार केला. पुढे अहिल्याबाईंनी नर्मदेच्या काठी महेश्वर येथे आपली राजधानी केली. दरम्यान, जुना दिवाण गंगोबातात्या याने एक डाव आखला की अहिल्याबाईंनी स्वत:स दत्तक घ्यावे व सर्व कारभार आपल्यावर सोपवावा. परंतु अहिल्याबाईंनी ते मान्य केले नाही. त्या वेळी गंगोबातात्या राघोबास मिळाला. पुढे राघोबांनी अहिल्याबाईंवर चाल करून येण्याची धमकी दिली. या सर्व कपटकारस्थानाचा अहिल्याबाईंना सुगावा लागल्यानंतर त्यांनी तुकोजीच्या मदतीने राघोबादादाला शह देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान थोरले माधवराव पेशवे यांच्याशी पत्रव्यवहार करून मदतीची याचना केली. त्या वेळी माधवरावांनी निरोप पाठविला की, तुमचे दौलतीविषयी जो कुणी पापबुद्धी ठेवील, त्याचे पारिपत्य बेलाशक करावे असे जरी म्हटले असले, तरी राघोबादादांकडे ५० हजारांची फौज होती. ती फौज घेऊन तो इंदूरवर चालून येणार अशी बातमी कळताच आहिल्याबाईनी एक युक्ती योजली. तिने पाचशे स्त्रियांची तलवारीने सज्ज अशी फौज तयार करून राघोबांच्या आघाडीच्या फौजेसमोर उभी ठाकली. हे पाहून राघोबांच्या मनात मोठा प्रश्न निर्माण झाला. कदाचित स्त्रियांशी लढताना आपला पराभव झाला तर आपला अपमान होऊन जगात अपकीर्ती होईल. अशा रीतीने राघोबांनी युद्ध न करताच माघार घेतली व राघोबांनी इंदोरला जाऊन अहिल्याबाईंची भेट घेतली. तिचा पाहुणचार पाहून व तसेच तिची लोकप्रियता व आदर्श जीवन पाहून राघोबादादा खजिल झाले व निरोप घेऊन निघून गेले.
अहिल्याबाईंनी जवळजवळ तीस वर्षे राज्यकारभार सांभाळला. तिचा प्रजाजनात लौकिक वाढतच होता. तसेच पेशवे, शिंदे, मोगल व निजाम या सर्वांवर तिच्या कर्तबगारीची छाप पडत होती. तिचे आचरण अत्यंत पवित्र होते.
पतीनिधनानंतर त्या फक्त शुभ्र वस्त्र नेसत असत. त्याचबरोबर देवपूजा, पुराणश्रवण, ब्राह्मणभोजन, परमेश्वर चिंतन तसेच रयतेचे प्रश्न सोडविणे अशा कामात त्या आपला वेळ घालवित असत. दरबारात बसून नियमित चार तास काम पाहात असत. रात्रीही पुन्हा सरकारी कामाकडे लक्ष देत असत. फक्त पाच तास निद्रेसाठी खर्च करीत असत, असा त्यांचा दिनक्रम चालत असे. त्या अतिशय दानशूर म्हणूनही अजरामर आहेत. त्यांनी अगणित दानधर्म केले. ते केवळ स्वत:च्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी त्यांनी मोठ्या सढळ हातानं दानधर्म केला. ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, घाट बांधले, नवीन मंदिराची उभारणी केली. ब्राह्मणांच्याबरोबर गोरगरिबांना सर्व तऱ्हेची मदत केली. आज ही हिंदुस्थानातल्या अनेक प्रसिद्ध क्षेत्राच्या ठिकाणी त्यांनी केलेल्या दानाची काहीतरी खूण आढळते. त्यामळे माळव्यात त्याची देवीप्रमाणे पूजा करतात. त्या आपल्या प्रजेला मुलासमान मानत असत. आपली प्रजा सुखी राहिली पाहिजे, अशाप्रकारे त्या प्रयत्न करीत असत. म्हणजे रयतेला सुखी ठेवण्याचा छत्रपती शिवरायांचा आदर्श त्यांनी आपल्यापुढे ठेवला होता. त्या नेहमी म्हणत, ’प्रजेचे सुख व त्यांचे घर हीच खरी राज्याची तिजोरी आहे. त्यांनी कोणावरही अन्याय केला नाही. जरी आपले कौटुंबिक जीवन दुःखी, कष्टी होते, तरी त्यांनी आपल्या प्रजेला कधीही दुःखी ठेवले नाही, यातच त्यांची थोरवी आहे. या थोर, कर्तबगार स्त्रीचा मृत्यू सन १७९५ च्या ऑगस्ट महिन्यात झाला. पुढे त्यांच्या स्मरणार्थ यशवंतराव होळकर यांनी महेश्वर नगरात घाट बांधून अहिलेश्वर नावाचे मंदिरही उभारले.
✍️ डॉ. सुनीलकुमार सरनाईक
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)