प्रार्थना संगीत ही जीवन उन्नतीची दिशा: कैशवचैतन्य कुंटे
schedule08 Oct 26 person by visibility 135 categoryसामाजिक
कोल्हापूर : प्रार्थना संगीत ही जीवन उन्नतीची दिशा आहे, असे प्रतिपादन संगीताचार्य प्रा. केशवचैतन्य कुंटे यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने ‘प्रार्थना संगीत’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. नंदकुमार मोरे होते.
प्रा. कुंटे म्हणाले, माणसा-माणसांतील परस्परसंबंध प्रार्थनेतून सांधले जातात. प्रार्थना या संगीताचा पाया आहेत. कर्णमधुरता व उत्कट भावनाशील अभिव्यक्ती ही प्रार्थनेत महत्त्वपूर्ण ठरते. जीवनाकडे सकारात्मकपणे पाहण्याची दृष्टी प्रार्थनेमुळे येते. परस्पर प्रीती, पूज्यताबुद्धीत वाढ होते. सर्व मनुष्ये सारखी असल्याचा भाव प्रार्थनेतून व्यक्त होतो. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी हे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून साधले. करुणेच्या किरणांनी भरलेले जग त्यांनी याद्वारे स्वीकारले.
डॉ. नंदकुमार मोरे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, मुळात माणूस हा प्राणी भटका होता. त्यामुळे संस्कृती संयोगातून अनेक गोष्टींची देवाणघेवाण झाली. प्रार्थना संगीत हे त्याचेच प्रगत रूप होय. प्रार्थना ही मानवी सद्भावाचा झरा अखंडित ठेवणारी, चैतन्यदायी ताकद असते. तिच्यामुळे अंत:शुद्ध चैतन्य गवसते.
मराठी अधिविभागप्रमुख व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संगीताचार्य पंडित सुधीर पोटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अनिता मिस्कूळ यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल तावडे यांनी आभार मानले.