मध्यप्रदेशातील इंडिया ओपन शुटींग स्पर्धेत पृथ्वीराज महाडिकांना कांस्यपदक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
schedule25 Mar 25 person by visibility 476 categoryक्रीडा

कोल्हापूर : शुटींगच्या स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा जिंकलेले चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी आज आणखी एका स्पर्धेत कोल्हापूरचा झेंडा फडकवला. मध्यप्रदेशमधील महू जिल्हयात इंडिया ओपन शुटींग स्पर्धा झाली. या स्पर्धेत शॉटगन ट्रॅप या प्रकारात आपल्या लक्ष्याचा अचुक वेध घेत, पृथ्वीराज महाडिक यांनी कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेमुळे राष्ट्रीय शुटींग अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आणि चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी नेमबाजीच्या स्पर्धेत आपला ठसा उमटवलाय. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये विविध बक्षिसे मिळवत, त्यांनी आपले कौशल्य सिध्द केलंय. हीच परंपरा कायम ठेवत आणखी एका स्पर्धेत त्यांनी बक्षिसावर नाव कोरले. मध्यप्रदेशमधील महू इथल्या आर्मी बेसमध्ये इंडिया ओपन ही प्री नॅशनल शुटींग स्पर्धा पार पडली. त्यामध्ये शॉटगन, रायफल, पिस्टल आणि एअर रायफल अशा विविध प्रकारात स्पर्धा झाल्या. त्यातील शॉटगन ट्रॅप विभागात सहभागी होवून पृथ्वीराज महाडिक यांनी कांस्यपदकाची कमाई केली. महाडिक यांनी अचुक नेम साधत, ५० पैकी ४२ गुण मिळवले. या यशामुळे राष्ट्रीय शुटींग अजिंक्यपद स्पर्धेसाठी पृथ्वीराज महाडिक यांची निवड झाले आहे.
या खेळासाठी त्यांना खासदार धनंजय महाडिक, सौ. अरूंधती महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले.