उत्कृष्ट गणेश मंडळांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बक्षिस वितरण
schedule12 Dec 25 person by visibility 45 category
कोल्हापूर : जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवांना प्रोत्साहन मिळावे, सामाजिक सलोखा वृद्धिंगत व्हावा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे यासाठी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी शासनाच्या पोर्टलवर नोंदणीची सुविधा देण्यात आली होती. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील एकूण 18 मंडळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यामध्ये शाहूवाडी, गडहिंग्लज, राधानगरी येथून प्रत्येकी एक मंडळ तर कागल येथून 2, हातकणंगले 3 आणि करवीर तालुक्यातील 10 मंडळांनी सहभाग नोंदवला. प्राप्त प्रस्तावांचे परीक्षण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती तसेच 2 अशासकीय सदस्यांचा समावेश असलेली निवड समिती तसेच तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती तसेच 2 अशासकीय सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली.
प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट मंडळांची निवड करताना विविध निकषांनुसार गुणांकन करण्यात आले. त्यानुसार शाहूवाडीतून श्री गणेश तरुण मंडळ, झेंडा चौक डोणोली, राधानगरीमधून श्री गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी, करवीरमधून शाहूपुरी युवक मंडळ, गडहिंग्लजमधून फ्रेंड्स ग्रुप गणेश उत्सव मंडळ, मुत्नाळ, हातकणंगलेतून श्री छत्रपती व्यायाम मंडळ, इचलकरंजी आणि कागलमधून आदर्श तरुण मंडळ यांची निवड करण्यात आली.
तालुका स्तरावरील निवडलेल्या मंडळांमधून जिल्हास्तरीय अंतिम निवड 11 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आली. त्यानुसार जिल्हास्तरीय पहिला क्रमांक श्री गणेश तरुण मंडळ, झेंडा चौक डोणोली (शाहूवाडी), दुसरा क्रमांक श्री गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी (राधानगरी) तर तिसरा क्रमांक आदर्श तरुण मंडळ, कागल यांनी पटकावला.
जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकासाठी 50 हजार, द्वितीय क्रमांकासाठी 40 हजार, तृतीय क्रमांकासाठी 30 हजार अशी पारितोषिके तर उर्वरित तीन तालुकास्तरावरील उत्कृष्ट मंडळांसाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांची रक्कम देण्याची तरतूद आहे. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षिस पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने प्रदान करण्यात आले.
हा बक्षीस वितरण समारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी निवड समितीच्या अध्यक्ष मोहिनी चव्हाण, सदस्य सचिव तेजस्विनी खोचरे पाटील, फारुक बागवान, अमित सुतार, उदय गायकवाड, डॉ. रणजित जाधव व प्रमोद पाटील उपस्थित होते.