प्रा. स्वाती कोरी यांना 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' जाहीर
schedule30 Sep 25 person by visibility 142 categoryसामाजिक

कोल्हापूर : कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन व राजर्षी शाहू अध्यासन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' यावर्षी प्रा. स्वाती महेश कोरी यांना जाहीर झाला आहे. प्रा. कोरी या दिनकरराव के. शिंदे स्मारक ट्रस्टच्या सचिवपदी कार्यरत असून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्या गडहिंग्लज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या.
पुरस्काराचा वितरण समारंभ शनिवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता, दसरा चौक येथील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन (मिनी हॉल) येथे संपन्न होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, ग्रंथ, शाल, कोल्हापुरी फेटा व रोख ५००० रुपये असे आहे.
पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून यापूर्वी बालकल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मजा तिवले तसेच संशोधन व शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ. ज्योती जाधव यांना प्रदान करण्यात आला आहे.
तसेच पवार ट्रस्टचे संस्थापक, ज्येष्ठ अर्थतज्ञ, प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित "राजर्षी शाहू महाराज: संक्षिप्त चरित्र" या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी प्रमुख पाहुणे आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालकल्याण संकुलचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेश शिरपूरकर असणार आहेत.
कार्यक्रमासाठी तहसिलदार विजय पवार, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक वसुधा जयसिंगराव पवार, श्रीराम ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष बी. ए. पाटील, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांची प्रमुख उपस्थिती आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रा. डॉ. दिग्विजय पवार, श्रीराम ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष बी. ए. पाटील, विलास पाटील, पांडुरंग माळी आदी उपस्थित होते.