रक्षाबंधन प्रेम, श्रद्धा, समता आणि संरक्षणाची भावना दृढ करण्याचा दिवस : मुनिश्री सारस्वत सागरजी महाराज
schedule30 Aug 26 person by visibility 140 categoryसामाजिक
▪️रक्षाबंधनाच्यानिमित्ताने जयसिंगपूरात प्रवचन संपन्न
जयसिंगपूर : रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम व्यक्त करण्याचा सण नसून, परस्परांप्रती प्रेम, श्रद्धा, समता आणि संरक्षणाची भावना दृढ करण्याचा दिवस आहे. जीवनात राग-द्वेष, अहंकार आणि भेदभाव बाजूला ठेवून सर्वांकडे समान दृष्टीने पाहिले पाहिजे. लाभ-अलाभ, सुख-दुःख, शत्रू-मित्र तसेच संयोग-वियोग यामध्ये समान भाव ठेवणे म्हणजेच ‘माध्यस्थ भाव’ होय, असे प्रतिपादन प्रज्ञाश्रमण मुनिश्री १०८ सारस्वत सागरजी महाराज यांनी केले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने जयसिंगपूर येथील इंद्रधनुष सभागृहात आयोजित प्रवचनात ते बोलत होते. प्रारंभी भगवान महावीर, आदिनाथ स्वामी, पार्श्वनाथ भगवान तसेच आचार्य भगवंतांना वंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित श्रावक-श्राविकांनी गुरुवर्यांचे आशीर्वाद घेतले.
महाराज म्हणाले, आचार्य कुंदकुंद स्वामी यांनी समयसार ग्रंथातून आत्म्याच्या सहज स्वरूपाचे विवेचन करताना सत्य प्राप्तीसाठी बुद्धीला माध्यस्थ करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. आपण एखाद्याला ‘आपला’ आणि दुसऱ्याला ‘परका’ मानतो, तेथे राग-द्वेष निर्माण होतो. मात्र सर्वांकडे समान दृष्टीने पाहिल्यास मनामध्ये समत्व निर्माण होते.
यावेळी त्यांनी अकंपनाचार्य आणि सातशे मुनिराजांची कथा सांगत श्रद्धेचे महत्त्व स्पष्ट केले. राजा श्रीवर्मा यांची मुनिराजांप्रती श्रद्धा होती; मात्र त्यांच्या मंत्र्यांच्या मनात अहंकार आणि अश्रद्धा होती. मुनिराजांच्या मौन, संयम आणि साधनेचा अपमान केल्यानंतर निर्माण झालेल्या प्रसंगातून शब्दांचा वापर किती विचारपूर्वक करावा, याचा संदेश महाराजांनी दिला. आपल्या मुखातून निघणारी वाणी धर्मात प्रेम आणि एकता वाढवणारी असावी. द्वेष, मतभेद आणि फूट निर्माण करणारी वाणी ही साधनेची नव्हे, तर कषायाची वाणी आहे, असे ते म्हणाले.
महाराजांनी श्रद्धेचे महत्त्व सांगताना, नजर श्रद्धेची असेल तर पाषाणामध्येही परमात्मा दिसतो; श्रद्धा नसेल तर साक्षात परमात्माही पाषाणासारखा वाटतो, असे स्पष्ट केले. गुरुंच्या आज्ञेवर पूर्ण विश्वास ठेवणे आणि त्याग, संयम व आत्मसाधनेच्या मार्गावर चालणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
रक्षाबंधनाच्या संदर्भात महाराजांनी पालक आणि मुलांच्या नात्यावरही भाष्य केले. मुलांनी असे कोणतेही कृत्य करू नये, ज्यामुळे माता-पित्यांची मान खाली जाईल. उलट त्यांच्या चांगल्या आचरणातून पालकांची मान उंचावली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
वेळ सर्वांना शिकवतो. अहंकारात जगणाऱ्यांना वेळ जमिनीवर आणतो; तर जमिनीशी जोडलेले राहणारे आकाशापर्यंत पोहोचतात, असा संदेश देत त्यांनी उपस्थितांना संयम, श्रद्धा, समता आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सर्व मुनीश्रींच्या पिंच्छिला रक्षासूत्र बांधून उपस्थित श्रावक - श्राविकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुनीश्री १०८ जयंत सागरजी महाराज, मुनीश्री १०८ सिद्धसागरजी महाराज, मुनीश्री १०५ श्रृतसागरजी महाराज, जयसिंगपूर शहर परिसरातील श्रावक - श्राविका उपस्थित होते.