सर्व महाविद्यालये, अधिविभागांत एकाच वेळी साजरा होणार वाचन प्रेरणा दिन; शिवाजी विद्यापीठाचे नियोजन
schedule12 Oct 24 person by visibility 288 categoryसामाजिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षापासून त्याची व्याप्ती महाविद्यालयांपर्यंत वाढवून सर्व संबंधित घटकांना सामावून घेऊन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११ वा. या कालावधीत हा उपक्रम विद्यापीठासह सर्व संलग्नित महाविद्यालयांत एकाच वेळी राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी दिली आहे.
कुलसचिव डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाचन ही व्यक्तीच्या सर्वांगीण विकासामध्ये भूमिका बजावणारी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. वाचनामुळे मनुष्य ज्ञानसंपन्न होतो आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी १५ ऑक्टोबर ही भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. यावर्षी शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विद्यापीठाचे सर्व आधिविभाग व सर्व संलग्नित महाविद्यालयातील सर्व घटकांचा या उपक्रमात समावेश करण्याचे ठरवले आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अधिविभाग प्रमुख व प्राचार्य यांनी सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाबाबत अवगत करावे आणि या वाचन प्रेरणा दिनाचे नियोजन शिस्तबद्धरित्या मोठ्या प्रमाणावर करावे. यंदाच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन असणारा मजकूर विद्यापीठामार्फत सर्व अधिविभाग व महाविद्यालयांना पाठविण्यात येईल. त्याचे सर्वांनी वाचन करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी इत्यादी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करतानाच कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यापीठाने तयार करून पाठविलेल्या नियमावलीचेही तंतोतंत पालन करावे, असेही डॉ. शिंदे यांनी कळविले आहे.