श्री अंबाबाई मंदिर परिसर सुरक्षा व सोयी-सुविधांबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून पाहणी
schedule30 Dec 25 person by visibility 58 categoryराज्य
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासोबतच भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी आज, मंगळवारी मंदिर परिसराची सविस्तर पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी मंदिर व्यवस्थापन, सुरक्षा आणि अतिक्रमण निर्मूलनाबाबत महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात मार्गदर्शक नियमावलीची(एसओपी) योग्य अंमलबजावणी करण्याच्याही सूचना केल्या.
महानगरपालिकेमार्फत मंदिराच्या बाहेरील सर्व विनापरवाना बांधकामे तात्काळ हटवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच, मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवरील अधिकृत दुकानदारांची यादी तयार करून, त्यांना अधिकृत क्रमांक देणे आणि त्यांच्या दुकानाच्या जागेचे चिन्हांकन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे भविष्यातील अतिक्रमणांना आळा बसेल. तसेच भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी मंदिर व्यवस्थापन समिती व दुकानदारांमध्ये संयुक्त बैठक घेऊन आवश्यक सूचना द्याव्यात, असे निर्देश दिले. मंदिर व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक नियमावलीमध्ये सुधारणा करण्यासाठी, नव्याने आवश्यक सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन आणि श्री पूजक यांच्या संयुक्त बैठकीतून आवश्यक एसओपी तयार करण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दक्षिण प्रवेशद्वाराजवळील विद्यापीठ वाहनतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी भवानी मंडप या ठिकाणी स्वतंत्र वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे.
▪️मंदिर सुरक्षा आढाव्यात जिल्हाधिकाऱ्यांनी खालील सूचना केल्या:
• सध्याच्या डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्स (DFMD) मध्ये आवश्यक सुधारणा करून, योग्य सेटिंग्जसह त्यांचा सक्षम वापर करावा.
• बॅग स्कॅनरमधून जाणाऱ्या वस्तूंचा दैनंदिन अहवाल ठेवावा आणि प्रतिबंधित वस्तूंसाठी पारदर्शक कंटेनरची व्यवस्था करावी.
• सर्व प्रवेशद्वारांवर भाविकांसाठी सर्वसाधारण सूचना तसेच ज्वलनशील वस्तू व हत्यारे मंदिरात नेण्यास बंदी असल्याचे स्पष्ट करणारे फलक लावावेत.
• मंदिर परिसरातील विविध ठिकाणी दिशादर्शक फलक बसवावेत.
• सुरक्षेच्या दृष्टीने, मंदिर परिसरात शांततेला धोका निर्माण करणारे तसेच अनावश्यक चित्रीकरण किंवा व्हिडिओ चित्रण करण्यास परवानगी देऊ नये.
गर्दीचे अचूक नियोजन करण्यासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांचा दर तासाला आढावा घेतला जाईल. मंदिर परिसरात भाविकांसह भेट देणाऱ्या सर्व नागरिकांनी शांत व स्वच्छ वातावरण राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
नवरात्र उत्सवात गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच गर्दी व्यवस्थानासाठी एआय तंत्रज्ञानाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून कायमस्वरूपी याच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प राबविण्यात येत आहे. या कामांना गती देऊन सर्व प्रणाली तातडीने दोन महिन्यांत सुरू करावी, अशा सूचनाही मंदिर प्रशासनाला देण्यात आल्या. या प्रकल्पाच्या अंमलबजावणींनंतर सुरक्षा व्यवस्था भक्कम होत गर्दी नियंत्रण आणि गुन्हेगारीला आळा बसेल. याचबरोबर ब्लॉकचैन आणि क्यूआर कोड प्रणाली अंतर्गत येत्या काळात प्रत्येक भाविकाची नोंद जतन केली जाणार आहे.
भाविकांना व्यवस्थापनासंबंधी काही सूचना किंवा तक्रारी मांडायच्या असल्यास त्या लेखी स्वरूपात मंदिर व्यवस्थापन कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी गर्दी नियमनासाठी जादा स्वयंसेवकांची नेमणूक करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी, एनएसएस आणि एनसीसी यांमधील प्रशिक्षणार्थी (इंटरनशिप) विद्यार्थ्यांची निवड करून, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन नेमणुका कराव्यात. या सर्व सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. यावेळी पोलीस, मंदिर, महापालिका प्रशासनाचे आणि आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी उपस्थित होते.





