SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संतवाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी विस्तारण्याची गरज: डॉ. सतीश बडवे; शिवाजी विद्यापीठात संत साहित्य संमेलन उत्साहातमहायुतीने आधी स्वत:च्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करावा : सतेज पाटील यांचा टोलाजागतिक दर्जाचे स्वयं-अध्ययन साहित्य काळाची गरज : डॉ. मधुकर वावरेकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुती उमेदवार यादी; 'यांना' मिळाली संधी... प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’ हा यशाचा खात्रीशीर मार्ग : प्रा. रामकुमार राजेंद्रन; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 266 विद्यार्थ्यांची आयआयटी बॉम्बेची ‘एडटेक इंटर्नशिप’ पूर्ण ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत मुंबई शहरातील खेळाडूंना नवी संधीराज्यभर 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’मतदान जनजागृती अभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमकोल्हापुरात महायुती : भाजप 36, शिवसेना 30, राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा निश्चित कोल्हापुरात ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी

जाहिरात

 

संतवाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी विस्तारण्याची गरज: डॉ. सतीश बडवे; शिवाजी विद्यापीठात संत साहित्य संमेलन उत्साहात

schedule30 Dec 25 person by visibility 39 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : समकाळातील विचारांच्या मर्यादा ओलांडून संतवाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी, व्याप्ती आणि समज वाढविण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलन अनुदानातून येथील भाषाविकास संशोधन संस्था आणि शिवाजी विद्यापीठाचे संत तुकाराम अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकोबारायांना समर्पित ‘संत साहित्य संमेलन-२०२५’च्या संमेलनाध्यक्ष पदावरुन ते बोलत होते. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते, तर साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे आणि प्रा. प्रवीण बांदेकर प्रमुख उपस्थित होते.

डॉ. बडवे म्हणाले, संतांनी आणि त्यांच्या साहित्याने समाजाविषयीचे भान सातत्याने जागे ठेवण्याचे काम केले. भक्तीच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी असल्याचे सांगणारा आणि प्रदान करणारा वारकरी संप्रदाय आहे. संतसाहित्याने समाजपरिवर्तनाची हाक देत असताना सामाजिक उत्थानासाठीचा विचार सतत मांडला. रंजल्या-गांजल्यांना उराशी पकडून त्यांच्यामध्ये उत्थानाची आस निर्माण करीत समग्र समाजामध्ये नैतिकतेची शिकवण प्रवाहित केली. संवाद साधणे ही वारकरी परंपरा आहे. संतांनी लोकांशी संवाद साधत कथनात्मक विवेचनावर भर दिल्याने संतविचारांचा, साहित्याचा प्रसार व्यापक प्रमाणात झाला. साहित्यनिर्मितीबरोबरच त्याचे सादरीकरणही महत्त्वाचे असल्याची बाब वारकरी परंपरा अधोरेखित करते. माणसात देव पाहण्यास शिकविणाऱ्या या परंपरेने समाजाला पर्यायी मूल्यव्यवस्था प्रदान केली. मराठी भाषेच्या समृद्धीमध्ये संतसाहित्याचे अतुलनीय योगदान असून समाजातील सर्व स्तरांतील घटकांच्या भाषेचे प्रतिबिंब त्यामध्ये पडले आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. प्रमोद मुनघाटे म्हणाले, साहित्य संमेलनांमध्ये साहित्याखेरीज सर्व प्रकारच्या स्थानिक लोकपरंपरा, लोकसंस्कृती यांचे प्रतिबिंब दिसल्याखेरीज त्याची उद्दिष्टपूर्ती झाली, असे म्हणता येत नाही. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेले संत साहित्य संमेलन हे खऱ्या अर्थाने यशस्वी झाले आहे. शिवाजी विद्यापीठात राबविण्यात येत असलेल्या अनेकविध दर्जेदार साहित्यिक उपक्रमांमुळे येथील मराठी अधिविभागाचा दबदबा राज्यात सर्वदूर पसरला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

प्रा. प्रवीण बांदेकर म्हणाले, संत साहित्य माणसाला ताठ कण्याने उभे राहण्याचे बळ पुरविते. अंतरीचा ज्ञानदीप प्रज्वलित करण्याचे कार्य हे साहित्य सातत्याने करीत आले आहे, याविषयी आपण कृतज्ञ असायला हवे.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, नितीमान समाज घडविणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य आहे. हेच कार्य संतसाहित्याने गेली अनेक शतके केले आहे. स्वार्थाच्या काळोखामध्ये मग्न असलेल्या समाजाला ज्ञानदीपाच्या प्रकाशात उजळून टाकण्यात संतांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अंगी नैतिकता धारण करणारा समाज घडविण्यासाठी संतसाहित्याने उपयुक्त कार्य केले. या साहित्याचे वाचन आणि चिंतन तर महत्त्वाचेच आहे, त्याचबरोबर त्याचे आचरणही तितकेच महत्त्वाचे आहे.

उद्घाटन सत्रात भास्कर हांडे यांनी रेखाटलेल्या संत तुकाराम यांच्या चित्राच्या प्रतींचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विशेष प्रावीण्याबद्दल डॉ. राजेश पाटील, मृण्मयी पांचाळ, अनुराधा गुरव आणि ऋतुजा बारवे यांचा सत्कार करण्यात आला. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत केले, संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. अवनीश पाटील, डॉ. प्रभंजन माने, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अरूण शिंदे, अरुणदादा जाधव, यांच्यासह शिक्षक, संत साहित्याचे अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▪️ग्रंथदिंडी, झिम्मा-फुगडीने जल्लोषी सुरवात
संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आज सकाळी ९.३० वाजता कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले. पालखीमध्ये भारतीय संविधान, श्री ज्ञानेश्वरी, तुकोबारायांची गाथा, कान्होबा महाराजांची अभंगगाथा आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते. शिपूर (ता. मिरज) येथील दत्त भजनी मंडळ आणि हुपरी येथील बाळूमामा भजनी मंडळ यांच्या साथीने पारंपरिक वारकरी भजनाच्या गजरात विद्यापीठ प्रांगणातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. दिंडीत विठठ्ल-रखुमाईसह विविध संतांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लक्ष वेधून घेतले. यावेळी धुंदवडे येथील जय जिजाऊ लेझीम पथक आणि मोरजाई झिम्मा फुगडी पथकातील विद्यार्थिनींनी आपल्या उत्साही सादरीकरणाने दिंडीत मोठी रंगत आणली. 

यावेळी शिवाजी विद्यापीठ प्रकाशन विभाग, महाराष्ट्र शासनाचा मुद्रणालय विभाग, वाचनकट्टा प्रकाशन यांच्या वतीने विशेष ग्रंथ प्रदर्शन व विक्री स्टॉल मांडण्यात आले. त्यांना उपस्थितांचा मोठा प्रतिसाद लाभला.

▪️परिसंवाद, मुलाखत आणि अभंगवाणी
संमेलनात दुपारच्या सत्रात ‘वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान’ या विषयावर डॉ. प्रमोद मुनघाटे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद रंगला. यामध्ये ज्ञानेश्वर बंडगर, डॉ. श्रीरंग गायकवाड, डॉ. गोविंद काजरेकर, प्रभाकर देसाई, प्रवीण बांदेकर, डॉ. अनिल गवळी यांनी सहभाग घेतला. त्यानंतर ‘वारी- एक आनंदयात्रा’ या विषयावर ज्येष्ठ छायाचित्रकार आणि वारीचे अभ्यासक संदेश भंडारे यांची ज्ञानेश्वर बंडगर यांनी मुलाखत घेतली. अविनास श्रीधर कुदळे (दुधगाव, ता. मिरज, जि. सांगली) यांच्या निवेदनासह शिपूर (ता. मिरज) येथील श्री दत्त भजनी मंडळाच्या सदस्यांनी कबीरपंथी भजन सादर केले, तर सायंकाळी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंगवाणीने संमेलनाची सांगता झाली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes