कोल्हापूर शहरासह लगतच्या १३ गावांतील विकासकामांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा
schedule19 Nov 26 person by visibility 109 categoryराज्य
◼️पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते व भूसंपादनासह विविध प्रश्नांवर चर्चा
कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि लगतच्या गावांमधील विविध विकासकामे व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत उचगाव, पाचगाव, मणेर मळा, मोरेवाडी यांसह १३ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅसमिन , उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, उपनिबंधक नीलकंठ करे यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
उचगाव, पाचगाव, मणेर मळा, आर. के. नगर, मोरेवाडी यांसह १३ गावांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ३२ नवीन पाण्याच्या टाक्यांची कामे करण्यात येणार आहेत. डिसेंबर २०२७ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यापैकी नऊ टाक्यांची कामे पूर्ण झाली असून, १३ टाक्यांची कामे सुरू आहेत. योजनेचा पहिला टप्पा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करावा, पूर्ण झालेल्या टाक्यांच्या चाचण्या घ्याव्यात तसेच पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पाइपलाइनची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिल्या.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ३५ गावांमधील दैनंदिन कचऱ्याचे एकत्रित संकलन व प्रक्रिया करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. चार ते पाच गावांनी एकत्रितपणे प्रस्ताव सादर केल्यास कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणे शक्य होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिंगणापूर बंधाऱ्यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. संबंधित नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करून त्याचा पाठपुरावा करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
याशिवाय गोल्ड क्लस्टर, मौजे कनेरीवाडी येथील गट क्रमांक ४७५ मधील भूसंपादित जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला देणे, चव्हाणवाडी-न्यू वाडदे येथे सन १९९० पासून शासकीय जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणे, विमानतळ वळण रस्त्यासाठी संपादित होणाऱ्या जागेच्या मोबदल्यात शासकीय जागेवर घरकुल योजना राबविणे, तामगाव ते उजळाईवाडी रस्ता, कामगार भवन, सहकार भवन, शेरी इनाम जमिनी वर्ग करणे, विविध गावांतील प्रस्तावित क्रीडांगणे मणेर मळा व उचगाव येथील रस्त्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.