शिवाजी विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कौतुकास्पद: आनंदराव पाटील; विद्यापीठाचा ६४ वा वर्धापन दिन उत्साहात
schedule18 Nov 26 person by visibility 138 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने गेल्या ६४ वर्षांच्या वाटचालीत शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मजल मारली आहे. विद्यापीठाची ही प्रगती एका दिवसात झालेली नसून अनेक पिढ्यांच्या प्राध्यापक, संशोधक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे फलित आहे. विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्तेची जपलेली परंपरा आणि केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्चशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते. चेन्नई येथील केंद्रीय चर्म संशोधन संस्थेचे संचालक डॉ. पी. थनिकैवेलम आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होते.
विद्यापीठातील गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार पदार्थविज्ञान अधिविभागातील डॉ. केशव राजपुरे आणि रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. संजय कोळेकर यांना, तर बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार मलकापूर येथील डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयातील डॉ. जयवंत इंगळे यांना प्रदान करण्यात आला.
आनंदराव पाटील यांनी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील समकालीन विद्यापीठांशी तुलना करताना शिवाजी विद्यापीठाने केलेल्या प्रगतीचे विशेष कौतुक केले. विद्यापीठाला प्राप्त झालेली ‘ए प्लस प्लस’ मानांकनाची श्रेणी आणि राष्ट्रीय क्रमवारीतील उत्तरोत्तर वाढते स्थान ही दीर्घकालीन गुणवत्तापूर्ण कामाची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाशी आपले विद्यार्थी म्हणून असलेले नातेही त्यांनी आवर्जून सांगितले. याच विद्यापीठातून एफ.वाय.बी.ए.चे शिक्षण घेतल्याचा आणि आपल्या जडणघडणीत विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
पाटील म्हणाले, आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया, डिजिटल माध्यमे आणि विविध आधुनिक उपकरणांचा वापर अपरिहार्य झाला आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर काळजीपूर्वक, जबाबदारीने आणि विवेकबुद्धीने करण्याची सवय विद्यार्थ्यांना लावणे आवश्यक आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेली प्रत्येक माहिती सत्य असेलच, असे नाही. अफवा, खोट्या बातम्या, दिशाभूल करणारे संदेश आणि सतत समोर येणाऱ्या रील्सच्या प्रभावापासून विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे. कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे, स्वतःच्या बुद्धीने विचार करणे आणि सारासार विवेक कायम ठेवणे यांचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्ञानवृद्धी, संशोधन आणि नवसर्जनासाठी व्हावा; तो मानवी विचारशक्तीची जागा घेणारा ठरू नये. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे योग्य बौद्धिक मार्गदर्शन (मेंटॉरिंग) करावे, असे आवाहन त्यांनी केले.
◼️‘विद्यापीठे नेतृत्वनिर्मितीची स्थाने’
ते म्हणाले, विद्यापीठे ही केवळ पदव्या देणारी केंद्रे नसून देशाचे भविष्य घडविणारी नेतृत्वनिर्मितीची महत्त्वाची स्थाने आहेत. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत कोणतीही तडजोड न करता विद्यार्थ्यांना कौशल्याधारित, रोजगाराभिमुख आणि संशोधनाभिमुख शिक्षण देण्यावर भर द्यावा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना अभ्यासक्रमातील कौशल्यविकासाचे घटक प्रत्यक्षात राबविणे गरजेचे आहे. जपानसारख्या देशांनी कौशल्यविकास आणि शिस्तीच्या बळावर जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण केले. त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांना परकीय भाषा, आधुनिक तंत्रज्ञान, उद्योजकता आणि जागतिक संधींची ओळख करून द्यावी. विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवांचा आणि संपर्कांचा उपयोग नव्या पिढीच्या मार्गदर्शनासाठी करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले, ग्रामीण आणि दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांमध्येही मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता आहे. मात्र, त्यांना योग्य संधी आणि प्रेरणा मिळणे आवश्यक आहे. विद्यापीठाने आपल्या परिसरातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमितपणे विद्यापीठात आमंत्रित करून विविध विभाग, प्रयोगशाळा, संशोधन आणि आधुनिक उपकरणांची प्रत्यक्ष ओळख करून द्यावी. शिक्षक, प्राध्यापक आणि संशोधकांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनात उच्चशिक्षण आणि संशोधनाविषयी कुतूहल निर्माण करावे. अशा छोट्या अनुभवांतून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी निश्चितपणे दिशा मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
◼️कोल्हापूरच्या चर्मोद्योगात विकासाच्या संधी: डॉ. पी. थनिकैवेलन
यावेळी कोल्हापूरच्या चर्मोद्योगाशी केंद्रीय चर्म संशोधन संस्थेचे जुने आणि महत्त्वाचे नाते असल्याचे केंद्रीय चर्म संशोधन संस्थेचे संचालक डॉ. पी. थनिकैवेलन यांनी नमूद केले. या सहकार्याला विद्यापीठाच्या सहाय्याने भविष्यात अधिक व्यापक स्वरूप देण्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, कोल्हापुरी चप्पलांच्या टिकाऊपणाचा आणि गुणवत्तेचा प्रश्न लक्षात घेऊन उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्याची गरज तत्कालीन केंद्रीय नेतृत्वाने संस्थेच्या निदर्शनास आणून दिली. विशेषतः चप्पलांच्या टाचेसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता वाढवून उत्पादन अधिक टिकाऊ करणे, हा त्यामागील महत्त्वाचा उद्देश होता. स्थानिक चर्मोद्योगाच्या गरजा आणि संशोधन संस्थेचे तांत्रिक कौशल्य यांची सांगड घालून अशा प्रश्नांवर उपाय शोधता येऊ शकतात. शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागासह संबंधित विभागांशी संशोधन, तंत्रज्ञान आणि कौशल्यविकासाच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्याची मोठी संधी आहे. विद्यापीठ, संशोधन संस्था आणि उद्योग यांनी एकत्रितपणे काम केल्यास स्थानिक उद्योगाला नवे तंत्रज्ञान, गुणवत्तावृद्धी आणि नवोन्मेषाची दिशा मिळू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
◼️कुलगुरूंनी दिली भविष्यातील वाटचालीसाठी पंचसूत्री
कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आपल्या पहिल्या वर्धापनदिनाच्या अध्यक्षीय मनोगतात विद्यापीठाच्या भविष्यातील वाटचालीसाठी गुणवत्ता, संशोधन, कौशल्य, समावेशन आणि सुशासन ही पंचसूत्री मांडली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने जागतिक दर्जाचे, बहुविद्याशाखीय शिक्षण देण्यावर भर देतानाच कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील संशोधनाबरोबरच साखर, दुग्ध, फाउंड्री, वस्त्रोद्योग, पूरप्रश्न आणि सह्याद्रीमधील जैवविविधता अशा स्थानिक प्रश्नांवरही संशोधन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पदवी शिक्षणाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि उद्योगांशी जोडून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये देणे, ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच मुलींच्या शिक्षणाला यशापर्यंत पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि वेळेत परीक्षा-निकाल, तक्रारींचे तत्पर निवारण व पारदर्शक कारभारातून विद्यार्थ्यांचा विद्यापीठावरील विश्वास अधिक दृढ करणे, ही विद्यापीठाची प्राथमिकता राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. या पंचसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संलग्न महाविद्यालये, माजी विद्यार्थी, समाज आणि उद्योग क्षेत्र या सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नॅनोविज्ञान, रसायनशास्त्र अधिविभाग ठरले उत्कृष्ट
शिवाजी विद्यापीठाने सन २०१९ पासून उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार देण्यास सुरवात केली. विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे असे दोन गट करून अधिविभागांचे सर्वंकष काटेकोर मूल्यमापन करण्यात येऊन हा पुरस्कार देण्यात येतो. संबंधित विभागाला पारितोषिकापोटी रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येते. यंदा उत्कृष्ट अधिविभागांसाठी देण्यात आलेले पुरस्कार अनुक्रमे असे- विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा- स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी व रसायनशास्त्र अधिविभाग. अन्य विद्याशाखांमधून यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट व अर्थशास्त्र अधिविभाग. केंद्र आणि अध्यासनांमध्ये युसिक-सीएफसी व शिवाजी विद्यापीठ नवोपक्रम, नवशोधन व साहचर्य केंद्र यांना पुरस्कार देण्यात आले.
◼️वर्धापन दिन समारंभात प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:
विद्यापीठस्तरीय विविध पुरस्कार असे-
गुणवंत शिक्षक: प्रा. केशव राजपुरे आणि प्रा. संजय कोळेकर
गुणवंत प्रशासकीय सेवक वर्ग १: विभा एल. अंत्रेडी आणि रमजान इलाही शेख
गुणवंत प्रशासकीय सेवक वर्ग २: उदय खेडकर आणि अनिल साळोखे
गुणवंत प्रशासकीय सेवक वर्ग ३: आनंदराव खामकर आणि संजय वसंत कोरवी
गुणवंत प्रशासकीय सेवक वर्ग ४: बाळू गणपती मेथे आणि देवगोंडा रामा चौगुले
संलग्न महाविद्यालयीन स्तरावरील पुरस्कार असे-
गुणवंत प्राचार्य: डॉ. राजेंद्र गोपाळ कुलकर्णी आणि डॉ. राजाराम शंकर साळुंखे
गुणवंत शिक्षक: डॉ. सचिन सुभाष पाटील आणि डॉ. एन. बी. मासाळ
गुणवंत सेवक वर्ग ३: मंगल युवराज कांबळे, न्यू कॉलेज, कोल्हापूर
गुणवंत सेवक वर्ग ४: राजू भीमसेन दोडमणी, ग्रंथालय परिचर, काकासाहेब चव्हाण महाविद्यालय, तळमावले
बॅरिस्टर पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. जयवंत इंगळे, डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर
यावेळी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी पसायदान सादर केले. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
तत्पूर्वी, विद्यापीठाच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे आनंदराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावलीराम घाणे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. राजाराम गुरव, डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. अजय साळी, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, आयक्यूएसी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.