बालविवाह मुक्त जिल्ह्यासाठी आढावा बैठक संपन्न
schedule17 Feb 26 person by visibility 77 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहू सभागृह येथे जिल्हा पुनर्वसन समिती, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण समिती व चाईल्ड हेल्प लाईन यांची आढावा बैठक संपन्न झाली.
बैठकीत जिल्हाधिकारी येडगे यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. कोल्हापूर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांनी बालविवाह रोखण्यासाठी सविस्तर कार्यपद्धती (SOP) तयार करावी. ही माहिती गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांना देऊन प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच बालविवाहाच्या घटनेत संबंधित अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी संस्थाबाह्य अनाथ बालकांना शासकीय सेवेत अनाथ प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बालविवाह मुक्त जिल्हा अभियानांतर्गत केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या https://stopchildmarriage.wcd.gov.in/ या संकेतस्थळावरील लिंकवर जाऊन बालविवाह होऊ नये यासाठी प्रतिज्ञा घ्यावी आणि महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या स्वाक्षरीचे स्वतःच्या नावाचे प्रमाणपत्र डाउनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे तसेच समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.