नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule30 Mar 25 person by visibility 190 categoryराज्य

▪️नागपूर जिल्हा सहकारी बँकेला आता शक्तीशाली जोड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर : ज्या जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकांचे जाळे सक्षमपणे कार्यरत आहे. त्या जिल्ह्यातील शेतकरी अधिक सुखी असल्याचे आपण पाहतो. याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये शेतीपुरक उद्योगाने चांगला आकार घेतल्याचे आपल्या निर्दशनास येते. या दृष्टीने विचार करुन नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या संस्थापक प्रशासकत्वाची जबाबदारी आजपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे सुपूर्द केल्याने शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग अधिक व्यापक होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संस्थापक प्रशासक नियुक्ती सोहळ्यात ते बोलत होते. गुढीपाडव्याचे औचित्य साधून नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या विशेष समारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, वित्त व नियोजन, कृषी व मदत पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जैस्वाल, आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, सहकार आयुक्त दिपक तावरे, प्रशासक विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार आशिष देखमुख यांनी प्रशासक पदाबाबत केलेल्या विनंतीचा विचार करुन आपण हा पहिला प्रयोग करत आहोत. सहकार आयुक्तालयाने यात यथायोग्य भूमिका निभावून येत्या दीड वर्षात नागपुरची जिल्हा सहकारी बँक आर्थिक फायद्यात येईल याची खात्री असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री यांनी गुढीपाडव्याच्या औचित्याने नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेली ही अपूर्व भेट आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रुपाने नागपूर जिल्हा सहकारी बँकेला आता एक शक्तीशाली जोड मिळाली आहे. येत्या दोन वर्षात ही बँक फायद्यात येण्यासह जिल्ह्यात सहकाराचे जाळे अधिक भक्कम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आमदार आशिष देशमुख यांनी जिल्हा सहकारी बँकेत सर्वांनी मुदत ठेवी दाखल करुन आकर्षक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केले. शिखर बँका, जिल्हा बँका व विविध कार्यकारी संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. यावर्षी राज्य बँकेने 52 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा पार केला असून 650 कोटींपेक्षा अधिक नफा बँकेने प्राप्त केल्याचे अनास्कर यांनी सांगितले.