आरटीओ मार्फत रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन
schedule02 Jan 26 person by visibility 39 categoryराज्य
कोल्हापूर : रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान 1 ते 31 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या अभियानाच्या कालावधीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.
रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने बॅनर्स, माहितीपत्रक, भित्तीपत्रके प्रदर्शित करणे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने दिशादर्शक चिन्हे, गतिरोधक चिन्हे, वळण चिन्हांचे फलक लावणे. प्रखर दिवे, हेल्मेट वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई, सीटबेल्टचा वापर न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे. ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह तपासणी मोहिम राबविणे. नेत्र तपासणी शिबीर आयोजित करणे. पादचाऱ्यांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी प्रबोधन करणे. अपघात प्रवण क्षेत्रांची तपासणी करणे. अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे. काळ्या काचा, कर्णकर्कष हॉर्न, सदोष नंबर प्लेट इत्यादी बाबत कारवाई करणे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती करणे. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीसाठी शासनामार्फत सुरू असलेल्या Good Samaritan योजनेची माहिती देणे व त्यांना प्रोत्साहीत करणे. अवयवदानाविषयी जागृती करणे, वाहनांमध्ये अग्नीप्रतिरोधक सुरक्षा संदर्भात जनजागृती करणे. रिफ्लेक्टीव्ह टेप नसणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रेलर वाहनांवर कारवाई करणे. चमकदार Dazzling Light लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे अशा योजना राबविण्यात येणार आहे.
दुचाकीस्वारांनी कोणत्याही परिस्थितीत विना हेल्मेट वाहन चालवू नये, विना सिटबेल्ट चारचाकी वाहन चालवू नये, पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालवू नये अन्यथा अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सर्व नागरीकांनी अभियानामध्ये रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व नियमांचे पालन करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





