पर्यावरण पूरक संशोधनास जागतिक पातळीवर खूप मोठ्या संधी : कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के
schedule02 Jan 26 person by visibility 86 categoryशैक्षणिक
वारणानगर : इनोव्हेशन, इंक्युबेशन व लिंकेजेस सेल अंतर्गत संशोधनास चालना व जागतिक पातळीवरील विविध संशोधन संधी यासाठी प्राध्यापक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन व संवाद साधण्यासाठी वारणा विद्यापीठात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
या चर्चासत्रासाठी क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी,ऑस्ट्रेलिया येथील संशोधक प्राध्यापक डॉ. दीपक डुबल व हिरोशिमा विद्यापीठ ,जपान येथील संशोधक प्राध्यापक डॉ. विनायक पारळे उपस्थित होते. चर्चासत्रच्या प्रारंभी कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी स्थानिक व वैश्विक स्तरावरच्या विविध समस्या निराकारणावरील संशोधनाला उपलब्ध असणाऱ्या संधीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी व वरील जागतिक संस्थांसोबत सामंजस्य करार ,स्टुडन्ट ट्विनिंग प्रोग्राम व फॅकल्टी एक्स्चेंज प्रोग्राम यासंदर्भातील चर्चेला सुरुवात करून दिली. प्रा. डॉ. दीपक डुबल यांनी क्वीनसलँड युनिव्हर्सिटी ,ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या विविध संशोधनाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये चिरंतन विकास, ऊर्जा साठवणूक व टाकाऊ घटकांचे उपयोजन इत्यादी संदर्भात जागतिक स्तरावर होत असलेल्या संशोधनाबद्दल मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थी व शिक्षकांसाठी ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संशोधन संधींची माहिती दिली. दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. विनायक पारळे यांनी एरोजेल क्षेत्रात सुरू असणाऱ्या संशोधनाचा आढावा घेतला तसेच हिरोशिमा विद्यापीठ, जपान व दक्षिण कोरिया मधील विविध विद्यापीठांमध्ये चालू असलेल्या संशोधन कार्याचा आढावा घेत वारणा विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापक यांना संशोधनाच्या संधी कशा उपलब्ध आहेत याचे मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वारणा विभाग शिक्षण मंडळाचे कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. व्ही. व्ही. कार्जीन्नी यांचे सहकार्य लाभले.
चर्चा सत्राच्या सुरुवातीला प्रास्ताविक व मान्यवरांची ओळख विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रा. डॉ. ए .एम. शेख यांनी केले.
या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये वारणा विद्यापीठांमधील इंजिनिअरिंग फार्मसी व विज्ञान विभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ. के. एस. पाटील, डॉ. एम. एस. धुत्तरगाव प्रा. एस. एम. आरडे, डॉ. एस. एस. पुजारी प्रा. एन. एफ .शेख यांनी विविध विषयांमध्ये होणाऱ्या संशोधनाविषयी संवाद साधला. समन्वयक प्रा. डॉ. आर .एस .पांडव यांनी आभार मानले.





