कोल्हापुरात ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी
schedule29 Dec 25 person by visibility 79 categoryराज्य
कोल्हापूर : थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी ध्वनीवर्धक आणि ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत सवलत देण्याचे आदेश जाहीर केले आहेत.
ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० अंतर्गत वर्षातील एकूण १५ दिवसांसाठी विहित मर्यादेत रात्री १२ पर्यंत सवलत देण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला आहे. यापूर्वी जिल्ह्यात १४ दिवसांची सवलत देण्यात आली होती, आता ३१ डिसेंबर शेवटचा १५ वा दिवस सवलती अंतर्गत घोषित करण्यात आला आहे.
या सवलतीबाबत प्रशासनाने काही अटींचे पालन करणे बंधनकारक केले आहे. या आदेशानुसार, ध्वनीक्षेपकांचा वापर केवळ विहित आवाजाची मर्यादा राखूनच करता येईल. ही सवलत रुग्णालय, शैक्षणिक संस्था किंवा 'शांतता क्षेत्र' (Silence Zones) म्हणून घोषित केलेल्या परिसरासाठी लागू असणार नाही. तसेच, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक लावण्यासाठी संबंधित पोलीस विभागाची पूर्वपरवानगी घेणे नागरिकांना बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.





