पोस्ट ऑफिसमधून दिवाळीचा फराळ परदेशात पाठविणे आता अधिक सुलभ
schedule15 Oct 26 person by visibility 144 categoryराज्य
◼️कोल्हापूर विभागातील 570 टपाल कार्यालयांत आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध
कोल्हापूर : दिवाळी हा भारतातील सर्वांत मोठा आणि आनंदाचा सण मानला जातो. दिवाळी म्हटले की घराघरांत तयार होणारा स्वादिष्ट फराळ, कुटुंबीयांची भेट आणि आनंदाचे वातावरण यांची आठवण होते. मात्र, शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या अनेक नागरिकांना दिवाळीच्या सणात आपल्या घरच्या फराळाची विशेष आठवण येते. अशा नागरिकांना आपल्या परदेशातील नातेवाईकांना दिवाळीचा फराळ पाठविता यावा, यासाठी भारतीय डाक विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोल्हापूर डाक विभागांतर्गत एकूण 570 टपाल कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या घरातील तयार फराळ, नियमानुसार परवानगी असलेल्या खाद्यपदार्थांचे योग्य पॅकिंग करून, परदेशातील नातेवाईक व मित्रपरिवाराकडे पोस्टाद्वारे पाठविता येणार आहे.
कोल्हापूर प्रधान डाकघर व कोल्हापूर रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिसमध्ये (झुडिओ शोरूम जवळ ) विशेष सुविधा -
दिवाळीच्या कालावधीत ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळावी, यासाठी कोल्हापूर प्रधान डाकघर आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिस येथे पार्सल पॅकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच, ग्राहकांच्या सोयीसाठी कोल्हापूर रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिसमधील पार्सल बुकिंगची वेळ 19 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत रात्री 9 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे नोकरदार, व्यावसायिक व इतर नागरिकांना आपल्या सोयीनुसार दिवाळीचा फराळ परदेशात पाठविता येईल.
आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा आणि दर – फराळ स्पीड पार्सल सेवेतून विदेशात पाठविण्यासाठी जगातील काही प्रमुख देशांसाठीचे दर खालील प्रमाणे आहेत.
युएसए- 5 किलोसाठी – 4561, 10 किलोसाठी -9051, 15 किलोसाठी – 12591, 20 किलोसाठी- 16131
युनायटेड किंगडम- 5 किलोसाठी – 3157, 10 किलोसाठी -6461, 15 किलोसाठी – 8585, 20 किलोसाठी- 10709
जर्मनी- 5 किलोसाठी – 3988, 10 किलोसाठी -5876, 15 किलोसाठी – 7764, 20 किलोसाठी- 9652
युएई- 5 किलोसाठी – 1971, 10 किलोसाठी -3493, 15 किलोसाठी – 4437, 20 किलोसाठी- 5381
ऑस्ट्रेलिया- 5 किलोसाठी – 5021, 10 किलोसाठी -9033, 15 किलोसाठी – 13045, 20 किलोसाठी- 17057
कॅनडा- 5 किलोसाठी – 5428, 10 किलोसाठी -8944, 15 किलोसाठी – 12838, 20 किलोसाठी- 16732
रशिया- 5 किलोसाठी – 3918, 10 किलोसाठी -6750, 15 किलोसाठी – 9582, 20 किलोसाठी- 12414
आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग, दर, पॅकिंग सुविधा आणि इतर माहितीसाठी खालील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा - सौरभ ढमणगे , विपणन अधिकारी – ९५४५५३७५२६, राजेंद्र पाटील, प्रभारी, व्यवसाय वृद्धी कक्ष कोल्हापूर – ९८२३१३७११४, आकाश इंजल, कार्यालयीन सहाय्यक – ७०२०४२१३६६ व सागर बोडके , कार्यालयीन सहाय्यक - ९८२३१५२१२२
भारतीय डाक विभागाची ही सुविधा नागरिकांसाठी सोयीस्कर असून, परदेशात राहणाऱ्या आपल्या प्रियजनांपर्यंत घरच्या दिवाळी फराळाची गोडी पोहोचविण्याची उत्तम संधी आहे. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर वैभव वाघमारे यांनी केले आहे.