वरिष्ठ जैन आचार्य कीर्तीयश सुरीश्वरजी यांचे विश्वशांती अष्टान्हिका महोत्सवासाठी कोल्हापुरात आगमन
schedule01 Mar 26 person by visibility 105 categoryसामाजिक
▪️उद्या सोमवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन: ललित गांधी
कोल्हापूर;जैन श्वेतांबर धर्मीयांचे देशभरातील पाच सर्वोच्च आचार्यापैकी एक श्रीमद विजय कीर्तीयश सुरीश्वरजी महाराज "विश्वशांती अष्टान्हिका महोत्सव" साठी 4 वरिष्ठ आचार्य व 50 हून अधिक साधू साध्वी यांच्या विशाल समूहासह
प्रथमच कोल्हापूर येथे दाखल झाले असून या महोत्सवानिमित्त त्यांचे स्वागत सोमवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता बिंदू चौक येथून भव्य शोभायात्रेने होणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या "जैन अल्पसंख्याक महामंडळाचे" अध्यक्ष (राज्यमंत्री) ललित गांधी यांनी दिली.
आचार्य कीर्तीयश सुरीश्वरजी यांच्या दिक्षेला नुकतीच साठ वर्षे पूर्ण झाली असून या साठ वर्षाच्या कालखंडात त्यांनी 70 हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला असून, 300 हून अधिक दीक्षा प्रदान केल्या आहेत. प्राचीन ग्रंथांचे पुनर्जीवन करण्याच्या विशेष मोहिमे अंतर्गत तीन कोटीहून अधिक संस्कृत व प्राकृत लोकांचे ताडपत्री वर पुनर्लेखन करून घेतले आहे. पाचशेहून अधिक आध्यात्मिक व धार्मिक ग्रंथांचे संकलन व संपादन केले आहे. अशा विविध अत्युच्च योगदान देणाऱ्या आचार्यांचे 60 वर्षात प्रथमच कोल्हापूर येथे आगमन होत आहे.
दोन मार्च ते नऊ मार्च या कालावधीमध्ये गुजरी व भक्ती पूजा नगर जैन मंदिर येथे विविध अनुष्ठानांचे आयोजन केले असून या महोत्सवानिमित्त "राष्ट्रीय संगीत महोत्सवा"चे सुद्धा आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये देशभरातील नामवंत संगीतकार, गीतकार उपस्थित राहणार आहेत. तसेच साखलचंद गोमराज गांधी व टिपूबेन साकलचंद गांधी यांच्या अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल "विशिष्ट मातृ-पितृ उपकार स्मरण महोत्सवा"चे सुद्धा आयोजन केल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.
सोमवारी सकाळी 8.30 वा. विविध मान्यवरांच्या हस्ते शोभा यात्रेला प्रारंभ होणार असून आठ दिवसाच्या कालावधीमध्ये देशाच्या विविध भागातून हजारो भाविक कोल्हापुरात उपस्थित राहणार आहेत.
तरी कोल्हापुरातील सर्व मान्यवरांनी शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन आचार्यांचे स्वागत करावे असे आवाहनही महाराष्ट्र शासनाच्या वतीने ललित गांधी यांनी केले आहे.