स्मृती मंदिरामुळे राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्याची प्रेरणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी; रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट
schedule30 Mar 25 person by visibility 136 categoryदेश

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसराला भेट देऊन आद्य सरसंघचालक पू. केशव बळीराम हेडगेवार यांचे समाधी स्थळ, तसेच द्वितीय सरसंघचालक पू. माधव सदाशिव गोळवलकर यांच्या यज्ञवेदीस्वरूप स्मृतिचिन्हाचे दर्शन घेतले.
‘हे स्मृती मंदिर भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनशक्ती या मूल्यांना समर्पित आहे. ते आपल्याला सतत राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्याची प्रेरणा देते. या दोन महापुरूषांची स्मृती जागविणारे हे स्थळ देशसेवेला समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा केंद्र आहे’, असा संदेश यावेळी पंतप्रधान मोदी यांनी यावेळी अभ्यागतांच्या अभिप्राय नोंदवहीत नोंदविला.
यावेळी त्यांनी महर्षी व्यास सभागृह, दत्तोपंत ठेंगडी सभागृह व परिसराची पाहणी केली, तसेच उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी स्वागत केले.