पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी कामगारांना २ ते ४ तासांची विशेष सवलत
schedule19 Oct 26 person by visibility 7 categoryराज्य
◼️मतदान केंद्राच्या अंतरानुसार सवलतीचा कालावधी निश्चित : सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे
कोल्हापूर : पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी संबंधित मतदार असलेल्या खासगी आस्थापनांमधील कामगारांना दोन तासांची विशेष सवलत द्यावी. मतदान केंद्राचे अंतर अधिक असल्यास प्रवासाचा विचार करून चार तासांची सवलत द्यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले आहे.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे, यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याबाबत अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.
काही ठिकाणी मतदान केंद्रांचे अंतर अधिक असल्याने प्रवासासाठी जास्त वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीत संबंधित मतदारांना दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहेत.
त्यानुसार, मतदानाच्या दिवशी संबंधित मतदार असलेल्या खासगी आस्थापनांनी कामगारांना मतदानासाठी दोन तासांची सवलत द्यावी. मतदान केंद्र दूर असल्यास प्रवासाचा कालावधी विचारात घेऊन चार तासांची सवलत द्यावी, असे आवाहन आयरे यांनी केले आहे.