डॉक्टर्स डे निमित्त कोल्हापुरात आरोग्यदायी उपक्रम: 'भाजप' आणि 'भागीरथी'च्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
schedule01 Jul 26 person by visibility 204 categoryआरोग्य
कोल्हापूर : निरोगी आणि व्याधीमुक्त शरीर हीच खरी संपत्ती आहे. आजच्या धावपळीच्या युगात अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून, वैद्यकीय तपासणी करुन नागरिकांनी वेळीच आरोग्याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले. डॉक्टर्स डे निमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने झालेल्या वैद्यकीय तपासणी शिबिरात त्या बोलत होत्या. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाली. तसेच डेंटीस्टकडून नागरिकांच्या दातांची तपासणी करून गरजेनुसार उपचार करण्यात आले.
डॉक्टर्स डे चे औचित्य साधून, भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने कोल्हापुरातील रामानंदनगर येथील बालाजी पार्कमध्ये, वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले.
गोपालकर क्लिनिकच्या सहकार्याने झालेल्या या शिबिराला अरुंधती महाडिक, नगरसेवक विजयसिंह खाडे, युवराज माने, डॉ. सुप्रिया गोपालकर, डॉ. सुनिती गोपालकर, डॉ. सोहम गोपालकर, डॉ. शुभम पाटील, डॉ. विजयकुमार गोपालकर, डॉ. तिलोत्तमा गोपालकर, डेंटीस्ट डॉ. निकीता कापसे, गर्जना आखाड्याचे अध्यक्ष नाना सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अरुंधती महाडिक यांनी वैद्यकीय शिबिराच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. हल्लीच्या काळात सर्वचजण धावपळ आणि तणावात असतात. अवेळी जेवण, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, फास्टफूड, जंकफूडचे सेवन यामुळे विविध व्याधी जडत आहेत. नोकरी किंवा व्यवसायामुळे आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. मात्र निरोगी आयुष्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. व्याधी झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा, आजार होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे, असे अरुंधती महाडिक यांनी सांगितले.
यावेळी डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची वैद्यकीय तपासणी करत, सल्ला-मार्गदर्शन दिले. तर डॉ. निकीता कापसे यांनी मौखिक आरोग्याची तपासणी केली. दातांची तपासणी करत, डॉ. कापसे यांनी गरजेनुसार दंतोपचार केले. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी भागीरथी संस्थेच्या स्वयंसेविका स्नेहल खाडे, राधा मेस्त्री, ऐश्वर्या देसाई, मीना पाटील, खाटिक समाजाच्या अध्यक्षा सुनीता घोडके, बालाजी हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी तुपारे, सचिव राजाराम निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.