'शिक्षक कुटुंबांच्या आरोग्यासाठी 'धर्मवीर आनंद दिघे आरोग्य कवच योजना' आणणार,' मंगेश चिवटे यांचे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत
schedule01 Sep 26 person by visibility 109 categoryराजकीय
कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना, वैद्यकीय प्रतिपूर्ती, टप्पा वाढ, आणि शालेय व वैयक्तिक मान्यतेचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. विद्यमान व माजी आमदारांनी हे प्रश्न वेळेत सोडवले असते, तर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची वेळ आली नसती, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख तथा पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनी व्यक्त केले आहे. कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
मागील दीड-दोन वर्षांपासून प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी कार्यालयात जनता दरबार घेत शिक्षकांचे प्रश्न ऑन-स्पॉट मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. याच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि शिक्षक बांधवांच्या आग्रहास्तव आपण आगामी निवडणुकीत रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर अनेक इच्छुक उमेदवार बाजूला उभे राहतील, परंतु आपला शिक्षकांशी असलेला घरोबा आणि जिव्हाळ्याचे संबंध यामुळे विजयाचा पूर्ण विश्वास असल्याचे चिवटे यांनी नमूद केले.
▪️प्रमुख मागण्या व घोषणा
* शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणार.
* महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजनेच्या धर्तीवर धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने 'शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजना' सुरू करण्याची घोषणा, ज्यामुळे शिक्षकांना उपचारासाठी कार्ड दिले जाईल आणि जवळील रुग्णालयात मोफत उपचार मिळतील.
* अर्थकारणाशी निगडीत असणारे टप्पा वाढ आणि जुनी पेन्शन यांसारखे मोठे प्रश्न सोडवण्यासाठी हजारो कोटींच्या बजेटसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणे.
या पत्रकार परिषदेला कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव शेटे, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष मिलिंद संकपाळ, शिक्षक सेनेचे प्रदेश सचिव उमेश कल्याणी, प्रशांत साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.