शूरवीरांच्या देशसेवेचा जिल्ह्याला अभिमान – जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule16 Dec 25 person by visibility 67 categoryराज्य
▪️निधी संकलन शुभारंभ, सशस्त्र सेना ध्वजदिन, विजय दिवस साजरा
कोल्हापूर : शूरवीरांच्या देशसेवेचा जिल्ह्याला अभिमान आहे. त्यांच्या साहस, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची परंपरा प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त त्यांच्या योगदानाचे पुनः स्मरण होत आहे अशा भावना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त करून नागरिकांना निधी संकलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती ताराराणी सभागृहात आजी माजी सैनिक, वीर माता, पत्नी यांच्या व कुटुंबियांच्या उपस्थितीत निधी संकलन शुभारंभ व सशस्त्र सेना ध्वजदिन, विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, निवृत्त ले.कर्नल विलास सुळकुडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवृत्त ले.कर्नल डॉ.भिमसेन चवदार, शिक्षणाधिकारी डॉ.मीना शेंडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाषबापू डोंगरे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, जिल्ह्याने मागील चार वर्षात ध्वजनिधी संकलनात उत्कृष्ट कार्य केले आहे. तसेच २०२४ सालात २.२४ कोटी निधी संकलन करुन १२५ टक्के उद्दिष्टपूर्ती साधली आहे. याबाबत विविध सहभागी कार्यालयांचे व नागरिकांचे त्यांनी आभार मानले. जिल्ह्यातील आजी माजी सैनिक तरुणांना मार्गदर्शक असून येणाऱ्या पिढीला देशसेवेबाबत तयार करतात. अशा या शूरवीरांच्या जिल्ह्यातील सुविध आणि सहकार्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्नशील असेल. जिल्ह्यात ध्वजदिनी संकलनात कोल्हापूर मधील मदत दिलेल्या विविध मान्यवरांचा सन्मान त्यांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये वाढदिवसाला खर्च होणारे वीस हजार रुपये ध्वजदिनाला दिल्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले व जिल्ह्यात प्रत्येक गावातून अशा प्रकारे निधी जमा करुन कोल्हापूर पॅटर्न तयार करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.भिमसेन चवदार यांनी केले. त्यांनी जिल्ह्यात माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या पत्नी यांची संख्या २१ हजार १०६, शौर्य पदक प्राप्त ७८, विविध १८४ युद्ध मोहिमांमध्ये सहभागी याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शहीद स्मारकाला पुष्प अर्पण करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांच्या हस्ते ध्वजदिन निधीचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित वीर माता, वीर पत्नी तसेच वीर पिता यांचा शाल व पुष्प देऊन सन्मान केला. दरवर्षी प्रमाणे माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक प्राविण्य मिळविल्याबद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच २०२४ सालात ध्वजदिना निधीत उत्कृष्ट योगदान दिलेल्या कार्यालयांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाषबापू डोंगरे यांनी मानले.





