श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईत दाखल
schedule17 Aug 25 person by visibility 183 categoryराज्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळ्यास
मुंबई : श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या सोमवार १८ रोजी मुंबईत दाखल होणार असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे.
श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकली असून नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी लंडन येथे ही तलवार ताब्यात घेतली. विमानतळ प्राधिकरणाकडून मंत्री ॲड. शेलार सकाळी 10 वाजता ही ऐतिहासिक तलवार स्वीकारतील. त्यानंतर विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन बाईक रॅली काढून, चित्ररथावर विराजमान करुन ही तलवार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडे नेण्यात येईल. दरम्यान, सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय सांस्कृतिक कार्य संचालनालय, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे “सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन” सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात श्रीमंत राजे रघूजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उद्घाटन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री ॲड.आशिष शेलार, श्रीमंत राजे रघूजी भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांच्यासह खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे हा कार्यक्रम होणार असून तो सर्वांसाठी खुला आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि सांस्कृतिक संचनालयाचे संचालक विभिषण चवरे यांनी केले आहे.
▪️तलवारीचे प्रदर्शन
श्रीमंत सेना साहेब सुभा रघुजीराजे भोसले यांच्या इंग्लंडमधून आलेल्या तलवारीचे व बारा वारसा मानांकित गडकिल्ल्यांच्या माहितीचे प्रदर्शन, दि. १९ ते दि.२५ ऑगस्ट २०२५, सकाळी ११ ते सायं ७ दरम्यान, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथील कला दालनात सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.