महायुतीची वज्रमूठ पक्की! कोल्हापुरात प्रचाराचा बिगुल वाजला, विजयाचा दावा ठाम
schedule16 Oct 26 person by visibility 123 categoryराजकीय
कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना व विकासाच्या शिदोरीवर महायुतीचा विजय शतप्रतिशत निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करत, कोल्हापुरातील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा एक अत्यंत जोशपूर्ण प्रचार मेळावा पार पडला. भारतीय जनता पार्टीने पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता जाधव, तर शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी झालेल्या या बैठकीत, बूथनिहाय सूक्ष्म नियोजन आणि प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत पोहोचण्याच्या आक्रमक रणनीतीवर सविस्तर खल करण्यात आला.
या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती या सर्व घटक पक्षांनी सर्वभेद विसरून एकाच व्यासपीठावर साधलेली वज्रमूठ ठरली; हीच अभेद्य एकजूट आमची खरी ताकद असल्याची गर्जना यावेळी नेत्यांनी केली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, डॉ. अशोकराव माने, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापौर सौ. रुपाराणी निकम, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण आणि प्रताप (भैय्या) माने यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.