गांधीनगरमध्ये टायर पेटवून रिपब्लिकन पक्षाचा जोरदार ‘रास्ता रोको’!
schedule15 Oct 26 person by visibility 128 categoryसामाजिक
◼️वाहतुकीच्या समस्येवरून प्रशासनाविरोधात संताप
◼️सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन दिवसांचा 'अल्टीमेटम'; अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा
कोल्हापूर : गांधीनगर मुख्य बाजारपेठेतील गंभीर वाहतुकीच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवक आघाडीच्या वतीने गांधीनगरमधील गणेश टॉकीज परिसरातील मेन रोडवर आक्रमक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान रस्त्यावर टायर पेटवून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला, तर ‘जय भीम’च्या निनादाने आणि जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडण्यात आला. प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी इंगवले यांच्या कार्यपद्धतीविरोधात कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
या आंदोलनात तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटकादरम्यान रस्त्यावर थर्मोप्लास्टिक पेंटने पांढरे पट्टे (लेन मार्किंग) मारण्यात यावेत, ही प्रमुख मागणी करण्यात आली. वाहतुकीला शिस्त लावणारी ही महत्त्वपूर्ण मागणी पुढील दोन दिवसांत पूर्ण करावी, असा सज्जड दम देत कार्यकर्त्यांनी मेन रोडवर ठिय्या मांडला. आंदोलनाची तीव्रता वाढल्याने गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी इंगवले आणि शाखा अभियंता अमोल कोळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. प्रशासनाच्या वतीने येत्या दोन दिवसांत शक्य ती कार्यवाही पूर्ण करण्याचे आणि पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आश्वासन देण्यात आले. आरपीआय (आठवले गट) चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या आंदोलनात युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, शहर उपाध्यक्ष किरण निकाळजे, अमर कांबळे, सुभाष कांबळे, नितीन कांबळे यांच्यासह अविनाश कांबळे, तानाजी इंगवले, योगेश आजाटे, संस्कार कोठावळे, कुमार भोसले, पिंटू जाधव आणि मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते.
दोन दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा अविनाश शिंदे यांनी यावेळी दिला आहे.